दिव्यांग व ८० वर्षावरील मतदार आज घरीच मतदान करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:34 AM2020-11-28T00:34:23+5:302020-11-28T00:40:37+5:30

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील ८० वर्षावरील मतदारांना व दिव्यांगांना उद्या शनिवारी टपाली मतदान प्रक्रिया आपल्या घरीच पूर्ण करता येणार आहे.

Divyang and voters above 80 years of age will cast their votes at home today |  दिव्यांग व ८० वर्षावरील मतदार आज घरीच मतदान करतील

 दिव्यांग व ८० वर्षावरील मतदार आज घरीच मतदान करतील

Next
ठळक मुद्देनागपूर विभाग पदवीधर निवडणूक : २१८ मतदारांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील ८० वर्षावरील मतदारांना व दिव्यांगांना उद्या शनिवारी टपाली मतदान प्रक्रिया आपल्या घरीच पूर्ण करता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने उद्या शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी यासाठी विशेष निवडणूक पथक नियुक्त केले आहे. याचा लाभ नोंदणी करणाऱ्या २१८ वयस्क व दिव्यांग मतदारांना घेता येणार आहे.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ तथा जिल्हाधिकारी नागपूर रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार उद्या २८ नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व ८० वर्षावरील एकूण २१८ मतदारांना टपाली मतपत्रिकाद्वारे आपले मतदान करता येणार आहे. यासाठी नागपूर शहराकरिता १४ व ग्रामीण भागासाठी ३ अशी एकूण १७ विशेष निवडणूक मतदान पथक तयार करण्यात आली आहे. या पथकामध्ये नायब तहसीलदार , लिपिक, कॉन्स्टेबल व व्हिडिओग्राफर असेल. या सर्व प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. हे पथक शनिवारी २१८ ही मतदारांच्या घरी जाणार असून सर्वप्रथम त्यांची ओळख पटवून प्राप्त झालेल्या टपाली मतपत्रिका सोबत असलेले प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणार आहेत. मतदारांनी टपाली मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर मतपत्रिकेचा लिफाफा घेऊन हे पथक जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करेल. सदर सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण होणार असून सुरक्षेसाठी या पथकासोबत पोलीस कॉन्स्टेबल देण्यात आलेले आहेत.सदर पथक कार्यालयीन वेळेमध्ये मतदारांच्या पत्त्यावर भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

यासंदर्भात सर्व मतदारांना मतदानाच्या संदर्भातील पूर्वकल्पना दूरध्वनीवरून देण्यात आलेली आहे. तसेच या बाबत उमेदवारांना देखील ई-मेल मार्फत कळविण्यात आले असून प्रक्रियेदरम्यान उमेदवार किंवा त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी हजर राहू शकतील, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सदर मतदार घरी आढळून न आल्यास २९ नोव्हेंबर रोजी पुन्हा हे पथक मतदारांच्या घरी भेट देणार आहे.

Web Title: Divyang and voters above 80 years of age will cast their votes at home today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.