दिव्यांगांची पार्किंगही मोकळी, १३ अवैध व्हेंडर पकडले

By admin | Published: February 28, 2017 02:23 AM2017-02-28T02:23:07+5:302017-02-28T02:23:07+5:30

‘रेल्वे स्थानकात स्वच्छतेची ऐसीतैसी’ या शीर्षकांतर्गत लोकमतने सोमवारच्या अंकात वृृत्त प्रकाशित करून रेल्वे स्थानक व परिसरातील अस्वच्छता चव्हाट्यावर आणली होती.

Divyangi's parking is also free, 13 illegal vendors caught | दिव्यांगांची पार्किंगही मोकळी, १३ अवैध व्हेंडर पकडले

दिव्यांगांची पार्किंगही मोकळी, १३ अवैध व्हेंडर पकडले

Next

रेल्वे प्रशासन हादरले : सर्व त्रुटी दूर करण्यास सुरुवात
नागपूर : ‘रेल्वे स्थानकात स्वच्छतेची ऐसीतैसी’ या शीर्षकांतर्गत लोकमतने सोमवारच्या अंकात वृृत्त प्रकाशित करून रेल्वे स्थानक व परिसरातील अस्वच्छता चव्हाट्यावर आणली होती. हे वृत्त प्रकाशित होताच रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस हादरले आहे.
सर्वांनीच आपापल्या विभागातील त्रुटी दूर करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनच्या मुख्य गेटला लागून असलेल्या पानटपऱ्या उड्डाण पुलाखाली स्थानांतरित झाल्या आहेत, तर दिव्यांगांच्या वाहनांसाठी राखीव पार्किंगची जागासुद्धा मोकळी करण्यात आली आहे.
दिव्यांगांच्या पार्किंगच्या जागेवर रेल्वे कर्मचारी आपली वाहने पार्क करीत असत. आता हे चित्र बदलले आहे. इतकेच नव्हे तर कचऱ्यांच्या पेट्यासुद्धा साफ झाल्या आहेत. कचरापेटीच्या बाहेरपर्यंत पडत असलेला कचरा सोमवारी दिसून आला नाही. लोकमतच्या वृत्तामुळे आरोग्य विभाग आणि सफाई कर्मचारीसुद्धा हादरले आहेत. दुसरीकडे इंजिनीअरिंग विभागही कडक पाऊल उचलणार आहे. या विभागातील एका अधिकाऱ्याने लोकमतच्या प्रतिनिधीला फोन करून रेल्वे स्थानकावरील नळांना तातडीने दुरुस्त करण्यात येईल, तसेच ज्या नळांना तोट्या आहेत परंतु त्या व्यवस्थित काम करीत नाही, याची चौकशी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
दुसरीकडे रेल्वे सुरक्षा दलानेसुद्धा रेल्वे स्टेशनवर अवैधपणे चहा, नाश्ता, भोजन आदी विकणाऱ्या १३ व्हेंडरला पकडून कारवाई केली. रेल्वे पोलिसांनीसुद्धा भिकाऱ्यांविरुद्ध अभियान चालविले. नागपूर रेल्वे स्टेशनवर असलेल्या नऊ भिकाऱ्यांविरुद्ध मुंबई भिक्षुक प्रतिबंधित कायदा १९८९ कलम ४ आणि ५ अन्वये कारवाई करून त्यांना पाटणकर चौकातील भिक्षुक भवन येथे रवाना करण्यात आले. याच अभियानांतर्गत रेल्वे पोलिसांनी प्लॅटफॉर्म २ वर जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये प्रवास करीत असलेल्या किल्ला वॉर्ड, बल्लारशाह येथील साईनाथ वासेकर (२२) याच्या जवळून ३८५० रुपये किमतीच्या देशीदारूच्या १५० बॉटल्स जप्त करण्यात आल्या. रेल्वे पोलिसांनी आरोपी वासेकरला अटक करून देशीदारू जप्त केली.(प्रतिनिधी)

लोकमतच्या वृत्ताचे बृजेश कुमार गुप्ता यांच्याकडून कौतुक
मध्ये रेल्वे नागपूर मंडळाचे रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी लोकमतच्या वृत्ताचे कौतुक केले आहे. उन्हाळ्याचा सिझन आता सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने लाईव्ह रिपोर्टिंग करून रेल्वे स्टेशनवरील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अगदी वेळेवर या समस्या उघडकीस आणून दिल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना कामातील त्रुटी तपासून पाहण्यास सांगितले आहे. मंगळवारी रेल्वे स्टेशनवर जाऊन समस्यांची पाहणी केली जाईल आणि संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अवैध व्हेंडर्सना सोडणार नाही
आरपीएफने लोकमतच्या वृत्ताला गांभीर्याने घेतले असून सोमवारी रेल्वे स्टेशनवर कारवाई करीत १३ अवैध व्हेंडरला पकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. अवैध विक्री करणाऱ्यांना सोडणार नाही. यापुढेही त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. स्टेशनच्या समोरील पानटपरी सुद्धा हटविण्यात आली आहे.
- ज्योतीकुमार सतीजा , आरपीएफ कमांडंट

Web Title: Divyangi's parking is also free, 13 illegal vendors caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.