दिवाळी २०१८; कानोले, खांडो आणि पुरीचे लाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 11:41 AM2018-11-05T11:41:55+5:302018-11-05T11:47:39+5:30
विदर्भाच्या ग्रामीण भागात या सणाला काही खास पारंपारिक पदार्थ केले जातात. त्यात सर्वत्र केला जाणारा पदार्थ म्हणजे, पिठीचे कानोले.
लोकमत न्यूज नेटवर्क
डॉ. प्रतिमा इंगोले
नागपूर: दिवाळी हा कृषीप्रधान संस्कृतीतील महत्त्वाचा सण. प्रत्येकाच्या पदरी आनंदाचे चार क्षण टाकणारा. वावरात पऱ्हाटीची रौप्यफुले फुलवणारा. विदर्भाच्या ग्रामीण भागात या सणाला काही खास पारंपारिक पदार्थ केले जातात. त्यात सर्वत्र केला जाणारा पदार्थ म्हणजे, पिठीचे कानोले.
दिवाळीच्या आधीपासूनच वऱ्हाडातील खेड्यापाड्यात कानोल्याचा मौसम सुरू होतो. मुख्य म्हणजे हा घरोघरी केला जाणारा पदार्थ सामुहिकरित्या केला जात असतो. ते करणे हे जरा जिकीरीचे काम असते. ओलवलेले गहू दळण्यापासून ते कानोले बनवण्यापर्यंत शेजारापाजारच्या काकू आणि मावश्यांचा हातभार लागतो. हे ओलवलेले गहू दळायला जड असतात. त्यामुळे दुपारच्या वेळी या बायका ते एकमेकींना दळू लागतात. दळण्याचा सोहळा पार पडला की मग सुरू होते त्या पिठाची गाळागाळ. त्यानंतर रवा वेचण्याचा कार्यक्रम. हा रवा वेचणे हे सर्वांना जमत नाही. काही हातच या निष्णात असतात. मग जिला तो चांगला वेचता येतो तिला घरोघरी मानाने बोलावून रवा वेचून घेतला जातो. मग घरची धनीण पिठी भाजून नंतर दळून घेतात. पिठी म्हणजे ओलावलेले गहू दळल्यानंतर ते बारीक पीठ निघते ते. हे पीठ मंदाग्नीवर खरपूस भाजतात. त्यानंतर पुन्हा दळतात. आता या कामात मिक्सरचा वापर केला जातो. पिठी भाजून व पुन्हा दळून झाली की पिठीत पिठीसाखर आणि भरपूर लोणकढे तूप कालवले जाते. त्यात वेलदोड्याची पूड मिसळतात. पिठीला चोळून चोळून तिचा लाडू करता येईल इतपत त्यात तूप घालतात.
दळलेल्या ओलवल्या गव्हातील पिठी असे सारणासाठी कामी येते. दळलेला रवा वेचल्यानंतर त्यातून तांब वेगळी काढतात. तांब म्हणझे जाडसर आणि लालसर रवा. उरलेला पांढराशुभ्र व एकसारखा रवा दुधात अथवा पाण्यात सकाळीच थोडे मीठ घालून भिजवून ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवतात. एकदाचे दोन वाजले की बायका आपापले पोळपाट व लाटणे घेऊन जिच्या घरी कानोले करायचेत तिच्याकडे जमतात. मग घरधनीण दगडाच्या लांबट खलबत्त्यात भिजवलेला उंडा कांडायला घेते. इतरजणी सतरंजीवर गोलाकार बसतात. छोट्याशा पातेल्यात पिठी घेतली जाते. मग कार्यक्रम सुरू होतो कानोल्यांच्या निर्मितीचा.
लांबट पुरी लाटायची असते. तशी जमणाऱ्या काहीच कुशल स्त्रिया असतात. पातळ काठ आणि मध्यभागी जाड अशा पुऱ्या लाटल्या जातात. मग ती पुरी अंगठ्याजवळच्या बोटावर घेऊन तिच्या कडा चिकटवून तिची खोळ तयार करतात. मग त्या खोळीत भाजलेली पिठी गच्च दाबून भरतात. मग हलक्या हाताने काठ चांगले दाबून सर्व बाजूंनी कानोला सारखा झाला आहे का हे तपासले जाते. मग तो सुपात ठेवला जातो. असे हे कानोले मग तेलात तळले जातात. खूप अलवार मेहनतीने बनलेले हे कानोले तोंडात टाकताच विरघळतात. अमरावती जिल्ह्यात लांबट कानोला करतात. जिला कानोला करता येतो तिला सुगरण समजले जाते.
दिवाळीतील दुसरा पारंपारिक पदार्थ म्हणजे खांडो. या प्राचीन पदार्थ आहे. त्याचे आताचे सुधारित रूप म्हणजे शंकरपाळे. पण खांडो अधिक रुचकर लागतात. यात कणकेमध्ये गुळाचे पाणी कालवून घट्ट कणिक भिजवली जाते. ही कणिक तेला किंवा तुपाचा हात लावून चांगली मळली जाते. त्याची पोळी लाटून थोडे मोठे चौकोनी काप करतात. हे काप तेलात तळून घेतात. कणकेमुळे खांडो खुसखुशीत होतात.
विदर्भातला तिसरा पारंपारिक पदार्थ म्हणजे पुरीचे लाडू. हे लाडू इतर लाडवांपेक्षा अधिक पौष्टिक असतात. हे करताना किंचित मीठ घालून बेसन भिजवतात. त्याच्या जाड पुºया तळून घेतात. या पुºया गरमगरम असतानाच त्याचा चुरा करायचा असतो. या चुºयाला साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात घालून त्याचे लाडू वळले जातात.
बेसनाच्या कडक पुºया हा पदार्थ अलीकडे दिसत नाही. शेवेच्या आधीचा हा पदार्थ टिकाऊ गुणवत्तेचा आहे. बेसनात ओवा, तिखट, मीठ, हळद टाकून त्याला घट्ट भिजवतात. त्याला बराच वेळ कुटले जाते. मग त्याच्या कडक पुºया तळतात. ही पुरी फुगू देत नाहीत.
शेतात जे पिकते त्यातूनच सणवार साजरे करायची जी आधीची पद्धत होती, त्या पद्धतीनुसार गव्हाचा व बेसनाचा जास्त वापर केला जात असल्याचे आपल्या लक्षात येईल.