Diwali 2022 : यंदा सूर्यास्तातील फरकामुळे धनत्रयोदशीचे दोन वेगळे मुहूर्त
By प्रविण खापरे | Published: October 19, 2022 06:26 PM2022-10-19T18:26:43+5:302022-10-19T18:29:52+5:30
दक्षिण-पश्चिम भारतात शनिवारी तर उत्तर-पूर्व भारतात रविवारी होणार साजरी
नागपूर : बरेचदा अक्षांश-रेखांशामुळे तर कधी सूर्योदय-सूर्यास्तामुळे पंचांगातील तिथी एकाच दिवशी येतात तर कधी एकच तिथी दोन दिवस साजरी केली जाते. तशाच स्थितीमुळे यावर्षी दीपोत्सवाचा तिसरा दिवस असणारी धनत्रयोदशी संबंध भारतात दोन वेगवेगळ्या मुहूर्तावर साजरी केली जाणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.
यंदा सूर्यास्तातील फरकामुळे धनत्रयोदशी मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, कोकण व गोवा, तसेच गुजरात व कर्नाटकाच्या काही भागात शनिवारी २२ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे तर अकोला, नागपूर, अमरावती, सोलापूर, जळगाव, वर्धा, नांदेड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा या भागात रविवारी २३ ऑक्टोबरला प्रदोष काळी त्रयोदशी तिथी असल्याने रविवारी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजतापर्यंत अत्यंत शुभ वेळा असून यावेळेस पूजा पाठ करणे लाभदायक ठरणार आहे. धनत्रयोदशीचा दिवस रविवारी दुपारी ४.०५ वाजतापर्यंत मध्यम असा आहे. याच दिवशी यमदीपदान असून धन्वंतरी जयंतीही आहे. भद्रा संध्याकाळी ६.०३ वाजता सुरू होणार असून पहाटे ४.४९ वाजतापर्यंत असणार असल्याचे डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.