Diwali Padwa Bhaubeej 2022 : आज बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 10:42 AM2022-10-26T10:42:33+5:302022-10-26T10:44:53+5:30
हा दिवस कार्तिक मासाचा प्रारंभ दिन असून भारतीय पुराणशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नागपूर : बुधवारी दीपोत्सवातील बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा व भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया, करिदिन अन्नकूट, गोवर्धन पूजन साजरे होणार आहेत. हा दिवस कार्तिक मासाचा प्रारंभ दिन असून भारतीय पुराणशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असून विक्रम संवत २०७९ ला याच दिवसापासून प्रारंभ होत आहे. शिवाय, कार्तिक मासापासूनच गुजराती नववर्षास प्रारंभ होत असतो.
कार्तिक मासाला पूर्वी ऊर्ज नावाने ओळखले जात होते. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला कृतिका नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. या महिन्यात पौर्णिमेला चंद्र कृतिका नक्षत्रापाशी असतो म्हणून याला कार्तिक मास म्हणतात, असे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
आजचा दिवस सर्व दृष्टींनी पूजनासाठी योग्य
बुधवारी सूर्यास्त संध्याकाळी ५.४८ वाजता होईल आणि त्यानंतर थोड्याच वेळात चंद्रोदय होईल. चंद्रकोर ओवाळल्यानंतर भाऊरायांना ओवाळण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्र तुला राशीत १५ अंश २५ कला आणि ३८ विकलावर राहणार आहे. याच दिवशी काही भागात गोपाळकृष्ण आणि गोवर्धन पर्वत याची षोडशोपचार पूजा केली जाते. आजचा दिवस सर्व दृष्टीनी पूजनासाठी योग्य आहे. राहू काळ दुपारी १२ ते १.३० या वेळेस असल्याचे डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.