दिवाळी आली तरी लोककलावंत उपाशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 04:59 AM2020-11-17T04:59:50+5:302020-11-17T05:00:00+5:30

यंदा दिसेल का खडी गंमत, दंडार, शाहिरीचा जल्लोष

Diwali is coming but folk artists are starving! | दिवाळी आली तरी लोककलावंत उपाशी!

दिवाळी आली तरी लोककलावंत उपाशी!

Next

  प्रवीण खापरे
    लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाची गती ओसरली असली तरी धास्ती संपली नाही. अनेक क्षेत्र अजूनही टाळेबंदच आहेत. मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून सांस्कृतिक क्षेत्र अनलॉक झाले असले तरी, त्याबाबतचे शासन निर्णय अद्याप स्थानिक यंत्रणांपर्यंत पोहोचले नसल्याचे सांगितले जाते. सांस्कृतिक क्षेत्राला मिळालेली परवानगीही अर्धवट आहे.
नाट्यगृह, चित्रपटगृहांना उघडण्याची व मोकळ्या मैदानातील सांस्कृतिक कार्यक्रमांना काही निर्बंधासह मुभा मिळाली, मात्र जत्रा अजूनही टाळेबंदच आहे. जत्रा नाही तर लोककलावंतांना रसिक नाही आणि रसिक नाही तर त्यांचे उत्पन्न नाही. दिवाळी आली तरी लोकांचे उपदेशात्मक मनोरंजन करणारा आणि परंपरा जपणारा लोककलावंत उपाशी असल्याची स्थिती आहे. 
नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात मंडई अर्थात जत्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या जिल्ह्यातील जवळपास लहान-मोठ्या ३०० गावांमध्ये मंडईचे आयोजन होत असते. मंडईत नाटक, शाहिरी प्रयोग, दंडार, खडी गंमत, गायन, नृत्याचे कार्यक्रम होत असतात. सोबतच खरेदी-विक्रीचे स्टॉल्स आणि वेगवेगळ्या व्यंजनांचा माहोल असतो. एकप्रकारे सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याचे हे या भागातील महत्त्वाचे माध्यम आहे. मात्र यंदा हे सगळे सोहळे रंगणार की नाही, अशी भीती लोककलावंतांमध्ये आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळालेली परवानगी मंडईपर्यंत येऊन अडकली आहे. जोवर मंडईचे आयोजन होणार नाही तोवर लोककलावंतांचे पोट भरणार नाही. 

पाच हजार कलावंत धोक्यात
पूर्व विदर्भातील या पाचही जिल्ह्यात ५०० हून अधिक मंडळ आहेत. प्रत्येक मंडळामध्ये १० लोककलावंतांचा भरणा असतो. पावसाळा वगळता वर्षभर ही मंडळ व्यस्त असतात. दिवाळीपासून ते उन्हाळा संपेपर्यंत यांची लगबग असते. मंडईतूनच यांची कला प्रसार पावते आणि आर्थिक उत्पन्न होत असते. मात्र टाळेबंदीमुळे उन्हाळा पार कोलमडला. दिवाळीपासून शासकीय अडचण निपटेल अशी आशा होती, मात्र अजूनही स्पष्टता नाही. मंडईंना आता परवानगी मिळाली नाही तर पाच हजार कलावंत धोक्यात येण्याची शक्यता आहे.
रोज कला सादर करावी आणि रोज पोट भरावे, अशी स्थिती या लोककलावंतांची असते. उन्हाळ्यात टाळेबंदी लागू झाली आणि कलावंतांनी मजुरी, भाजीपाला विक्री असे पर्याय निवडले. कलावंतांना अशास्थितीत जगताना बघून डोळे पाणावतात. मंडईंना परवानगी मिळाली नाही तर कलावंत लोककलेपासून विरक्त होण्याची भीती आहे. 
- शाहीर धर्मदास भिवगडे, अध्यक्ष : विदर्भ शाहीर कलाकार परिषद

Web Title: Diwali is coming but folk artists are starving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.