दिवाळी फटाक्यांच्या ध्वनी व वायुप्रदूषणाची नागपुरात होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:47 AM2018-11-06T10:47:11+5:302018-11-06T10:49:14+5:30
उपराजधानीत दिवाळीत अधिक आवाज करणाऱ्या विस्फोटक फटाक्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वारे जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दिवाळीत तीन दिवस ध्वनी व वायुप्रदूषणाची तपासणी केली जाणार आहे.
रिता हाडके।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत दिवाळीत अधिक आवाज करणाऱ्या विस्फोटक फटाक्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वारे जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दिवाळीत तीन दिवस ध्वनी व वायुप्रदूषणाची तपासणी केली जाणार आहे. यासाठी १० झोनस्तरावर नॉईस मॉनिटरिंग आणि तीन भागामध्ये एअर मॉनिटरिंग मशीन लावण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी दिवाळीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने निवासी, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात ध्वनी प्रदूषणाची तपासणी करण्यात आली होती. दिवाळीच्या तीन दिवसात कळमना मार्केटमध्ये दुपारपासून रात्रीपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्वाधिक फटाके फोडण्यात आल्याने ध्वनी प्रदूषण ८६.४ डेसिबलपर्यंत पोहोचले होते. त्याच दिवशी महालमध्ये रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवळी सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण ८३.७ डेसिबल इतके होते. मेडिकल चौकात ८०.५ होते. भाऊबिजेच्या दिवशी व्यापारी क्षेत्र असलेल्या महालमध्ये सकाळी ६ ते रात्रीपर्यंतचे ध्वनी प्रदूषण ७३.७ डेसिबल इतके होते. तर वायुप्रदूषण ७३.७ डेसिबलपर्यंत पोहोचले होते.
१०० फटाक्यांच्या लडीवर बंदी
पर्यावरण सुरक्षा कायद्यांतर्गत अधिक आवाजाचे आणि १०० फटाक्यांची लडी फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
प्रदूषणाची होणार तपासणी
दिवाळीच्या सात दिवसापूर्वीपासूनच उद्योगभवन, नॉर्थ अंबाझरी आणि सदर येथे ध्वनी प्रदूषणाची नियमित तपासणी केली जात आहे. दिवाळीच्या तीन दिवसात १० झोनअंतर्गत ध्वनी प्रदूषणाची तपासणी केली जाईल.
- हेमा देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ