धनत्रयोदशीला खरेदीची सुवर्णसंधी; सोने १०० रुपयांनी उतरले, चांदीत ८०० रुपयांची वाढ
By मोरेश्वर मानापुरे | Published: November 9, 2023 10:34 PM2023-11-09T22:34:06+5:302023-11-09T22:34:11+5:30
सराफांकडे सोने खरेदीसाठी गर्दी
नागपूर : धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला बुधवारच्या तुलनेत गुरुवार, ९ नोव्हेंबरला दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण झाली तर चांदीचे दर ८०० रुपयांनी वधारले. काही दिवसांआधी ६२,४०० रुपयांवर गेलेले सोन्याचे भाव कमी झाल्याने लोकांची सोने खरेदीसाठी सराफांकडे गर्दी आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीला भाव फारसे वाढणार नसल्याने लोकांनी सोने खरेदीची तयारी केली आहे. व्यापारीही ग्राहकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.
९ नोव्हेंबरला दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ८ नोव्हेंबरच्या ६१ हजारांच्या तुलनेत ६०,९०० रुपयांपर्यंत कमी झाले, तर चांदीत ८०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ७२,५०० रुपयांवर पोहोचली. गुरुवारी सकाळी खुलत्या बाजारात सोन्याचे दर ५०० रुपयांनी कमी होऊन ६०,५०० रुपयांवर स्थिरावले. दुपारच्या सत्रात सोन्याचे भाव स्थिर होते, पण अखेरच्या सत्रात ४०० रुपयांनी वधारून ६०,९०० रुपयांवर पोहोचले. अर्थात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने १०० रुपयांनी उतरले.
४ नोव्हेंबरला सोन्याचे दर ६१,५०० रुपये आणि चांदी ७३,१०० रुपयांवर स्थिर होती. ६ रोजी सोन्यात १०० रुपयांची घसरण तर चांदीत १०० रुपयांची वाढ झाली. ७ रोजी सोने ५०० रुपयांनी कमी होऊन भाव ६०,९०० रुपयांवर पोहोचले, तर चांदीत तब्बल १४०० रुपयांची घसरण होऊन भाव ७१,८०० रुपयांपर्यंत कमी झाले. ८ नोव्हेंबरला सोन्याने ६१ हजार आणि ९ नोव्हेंबरला ६०,९०० रुपयांची भावपातळी गाठली. धनत्रयोदशीला भावात चढउतार होण्याची शक्यता कमीच असल्याने सोने खरेदी जोरात राहण्याची शक्यता आहे.
धनत्रयोदशी गुरुवार आणि शुक्रवारी आल्याने लोकांनी गुरुवारी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. शुक्रवारीही सराफांकडे सोने खरेदीसाठी लोक गर्दी करतील. लोकांची गर्दी पाहता सोन्याचे दर वाढले आहेत, असे दिसत नाही - राजेश रोकडे, संचालक राजेश रोकडे.