दिवाळी एक्स्प्रेस हाऊसफुल्ल
By admin | Published: August 27, 2015 02:51 AM2015-08-27T02:51:05+5:302015-08-27T02:51:05+5:30
दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात.
दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात. यामुळे या काळात खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याची स्थिती असते. एरव्ही ७०० ते ९०० रुपयांना मिळणारे ट्रॅव्हल्सचे तिकीट दिवाळीच्या काळात २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांवर पोहोचते. प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि फायदेशीर माध्यम म्हणून असंख्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन दिवाळीतील सर्व आरक्षित तिकिटांचे आरक्षण झाले आहे. दिवाळीच्या काळात नागपुरातून मुंबई, पुणे, दिल्ली आणि बहुतांश शहरात जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे ‘वेटींग’ ४०० पर्यंत पोहोचले आहे.
दिवाळीला दोन महिने असताना आताच आरक्षणाची ही स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ताण पडणार हे निश्चित झाले आहे. नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये १६ नोव्हेंबरला २२६ वेटींग, १८ नोव्हेंबरला ३६ वेटींग आणि २१ नोव्हेंबरला ४८ वेटींग आहे. याच मार्गावरील १२११४ नागपूर-पूणे गरिबरथ एक्स्प्रेसमध्ये १३ नोव्हेंबरला २०८ वेटींग, १५ नोव्हेंबरला ७६६ वेटींग, १७ नोव्हेंबरला २८८ वेटींग आहे.
मुंबई मार्गावरील स्थिती तर अतिशय बिकट आहे. या मार्गावरील गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १४ नोव्हेंबरला तिकीटच मिळण्याची सुविधा नसून ‘रिग्रेट’ची स्थिती आहे. १५ नोव्हेंबरला ‘रिग्रेट’, १६ आणि १७ नोव्हेंबरला वेटींग ७० असून २२ नोव्हेंबरपर्यंत वेटींग पाहावयास मिळत आहे.
१२१३० बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेसमध्ये १२ आणि १३ नोव्हेंबरला ५० वेटींग, १४, १५ आणि १६ नोव्हेंबरला तर तिकीटच उपलब्ध नसून २३ नोव्हेंबरपर्यंत हीच स्थिती आहे.