दिवाळी फराळ २०१८; विदर्भातले पारंपारिक रोडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:23 AM2018-10-30T10:23:34+5:302018-10-30T10:24:04+5:30
खवैय्ये आणि खिलवैय्ये अशी ज्यांची ख्याती आहे, त्या वैदर्भियांचा रोडगा हा दिवाळीतला एक महत्त्वाचा आवडता खाद्यप्रकार. रोडगा हा नावानुसारच दिसायला रांगडा दिसणारा पदार्थ.
अस्मिता कोठीवान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: खवैय्ये आणि खिलवैय्ये अशी ज्यांची ख्याती आहे, त्या वैदर्भियांचा रोडगा हा दिवाळीतला एक महत्त्वाचा आवडता खाद्यप्रकार. रोडगा हा नावानुसारच दिसायला रांगडा दिसणारा पदार्थ. पण अत्यंत गुणकारी. तो पचायला हलका, कफकारक, बलदायक, अग्निदीपक, सर्दी-खोकला नाशक असा अनेकविध गुणांनी युक्त. दिवाळीच्या सुमारास फक्त संध्याकाळी-रात्री पडणाऱ्या थंडीने गारठलेल्या किंवा सर्दाळलेल्या नागरिकांना पुढील हिवाळ्यात औषधी साथ देणारा एक पदार्थ. याचे महत्त्व इतके की, देवीच्या आळवणीतही त्याची वर्णी लागलेली आहे. सासुरवाशिणी देवीची आराधना करताना, तिने आपल्याला लवकर आशीर्वाद द्यावा यासाठी रोडग्याचा नैवैद्य दाखवतात. विशेष म्हणजे देवीच्या आरतीमध्येही त्याचा समावेश केला जातो. जसे, सत्वर पाव गे मला, भवानीआई रोडगा वाहीन तुला...
तर असा हा रोडगा दिवाळीच्या दिवसापासूनच घरोघरी बनविला जाऊ लागतो. याला रोडगा किंवा पानगे असे म्हटले जाते.
रोडग्याची पाककृती
साहित्य-गव्हाचे पीठ, तेल, मीठ, गूळ व साजूक तूप.
रोडगे भाजण्यासाठी गोवऱ्या.
कृती- गव्हाच्या पीठात मीठ व मोहन घालून ते घट्ट भिजवावे. अर्धा तास ती झाकून ठेवावी. नंतर हव्या तेवढ्या आकाराचे गोळे करून घ्यावे. एकेका गोळ्याला वाटीसारखे थोडेसे खोलगट करून त्याला तेल लावावे. त्यावर थोडे कोरडे पीठ भुरभुरावे. असे तीन गोळे एकावर एक ठेवून त्याचा एक चपटा जाडसर गोळा तयार करावा.
अंगणात गोवऱ्या पेटवून त्याचा जाळ विझला की त्या गरम विस्तवात हे गोळे दाबून ठेवावे. थोड्यावेळ ते राखेतच राहू द्यावे. अर्ध्या-पाऊण तासात ते चांगले शिजतात. वरून दिसताना खमंग दिसू लागतात. गोळे थोडे थंड झाले की बाहेर काढून स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. मग हा रोडगा फोडून त्यावर कढवलेले तूप घालावे व झाकून ठेवावे.
ताटात वाढताना रोडगा, तुरीच्या डाळीचे घट्ट वरण, वांग्याची किंवा लाल भोपळ्याची भाजी वाढावी. रोडग्यासोबत गूळ आणि तूपही आवडीने खाल्ले जाते.
काही ठिकाणी या रोडग्यांचा बारीक चुरा करून त्यात गूळ व तूप घालून त्याचे पुन्हा छोटे छोटे लाडू वळतात.
अतिशय चविष्ट, गुणकारी व दीर्घकाळ टिकू शकणारा हा पदार्थ दिवाळीची रंगत अजूनच वाढवतो.