मध्य रेल्वेकडून प्रवाशांना पुणे-नागपूर सुपरफास्टची दिवाळी भेट; आजपासून धावणार विशेष एकेरी गाडी
By नरेश डोंगरे | Published: November 4, 2023 07:11 PM2023-11-04T19:11:30+5:302023-11-04T19:11:41+5:30
खासगी प्रवासी बसवाल्यांना चाप
नागपूर : दिवाळीच्या सणाला निघालेल्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दराने प्रवास भाडे घेऊन त्यांची आर्थिक लुट करणाऱ्या खासगी बसवाल्यांना चाप देण्यासाठी रेल्वेने पुणे नागपूर ही विशेष एकेरी रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी, ५ नोव्हेंबरपासून ही रेल्वेगाडी सुरू होणार आहे.
पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर दिवाळीच्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी होते. अचानक गर्दी वाढल्याने रेल्वेत रिझर्वेशन मिळत नाही. त्यामुळे बहुतांश प्रवासी रेल्वेकडून खासगी बस (ट्रॅव्हल्स)कडे धाव घेतात. अचानक प्रवाशांची मोठी झुंबड उडाल्याचे पाहून ट्रॅव्हल्सचे संचालक गैरफायदा उचलतात. सोळाशे-अठराशेचे प्रवास भाडे साडेतीन चार हजार आणि त्याहीपेक्षा जास्त करतात. प्रवाशांकडे पर्याय नसल्याचे हेरून ट्रॅव्हल्सवाले त्यांची आर्थिक लूट करतात.
दुसरीकडे साधन उपलब्ध नसल्याने अनिच्छेने का होईना मात्र प्रवाशी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे जास्तीची रक्कम मोजून प्रवास करतात. खास करून दरवर्षी पुणे - नागपूर मार्गावर दिवाळीच्या आठ दिवसांपूर्वीपासून तो दिवाळीच्या पुढच्या दोन आठवड्यांपर्यंत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. ते लक्षात घेत मध्य रेल्वेने ०२१०७ क्रमांकाची विशेष ट्रेन पुणे - नागपूर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी, ५ नोव्हेंबर पासून ती धावणार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता ही रेल्वेगाडी पुण्यातून सुटेल आणि सोमवारी सकाळी ६.५० वाजता नागपूरला पोहचेल.
२४ डबे अन् १३ जागी थांबे
२४ डब्यांच्या या गाडीत १३ शयनयान, दोन एसी -१, तीन एसी-२ आणि जनरल ६ तसेच दोन एसएलआर कोच राहणार आहे. पुण्यानंतर नागपूरपर्यंत उरुळी, दाैंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावल, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.