आली दिवाळी; आज वसुबारस, धनत्रयोदशी व गुरुद्वादशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 10:29 AM2019-10-25T10:29:08+5:302019-10-25T10:53:51+5:30
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धनाची पूजा केली जाते. धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो.
नागपूर : शुक्रवारी दीपोत्सवाचा दुसरा दिवस असून, सूर्यास्ताच्या वेळी वत्सासमान जिचा वर्ण आहे, अशा सवत्स गाईचे पूजन करून तिच्या पायावर तांब्याच्या पात्राने अर्घ्य देऊन... ‘क्षिरोदार्णवसुभूते सुरासुरनमस्कृते, सर्वदेवमय मातर्गृहाणार्घ्य नमोस्तु ते’ हा मंत्र म्हणावा व नंतर गाईला उडिद आदींचे वडे वगैरे खाण्यास देऊन ‘सर्वदेवमये देवी सर्वदेवैरलंकृते, मातर्ममाभिलषितं सकलं कुरू नंदिनी’ हा मंत्र म्हणून प्रार्थना करावी, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
या दिवशी तळलेले तसेच गाईचे दूध, तूप, दही व ताक वर्ज्य करावे. उडिदमिश्रित अन्नाचे भोजन, भूमीवर शयन करावे तसेच याच द्वादशीला आरंभ करून पाच दिवसापर्यंत पूर्वरात्री निरांजनाचा विधी करावा. धनत्रयोदशी याच दिवशी असल्यामुळे, संध्याकाळी कणकेचा दिवा दक्षिण दिशेला ज्योती करून लावावा. दिव्याची पूजा करावी आणि ‘मृत्यूनां पाशदंडाभ्यां कालेन श्यामयाहस, त्रयोदश्यां दीपदानात सूर्याज: प्रतितां मम’ हा मंत्र म्हणावा आणि नंतर दक्षिणेला तोंड करून यमदेवतेला नमस्कार करावा. गणपती, कृष्णाची उपासना करावी. त्यामुळे, अपमृत्यू टळतो, असे शास्त्र सांगत असल्याचे वैद्य म्हणाले.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धनाची पूजा केली जाते. धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी नरसोबावाडीहून गाणगापूरसाठी प्रस्थान केले.
या दिवशी सकाळी ९.३० ते ११ ही अमृत वेळा व दुपारी १२.३० ते २ वाजतापर्यंत शुभवेळा आहे. या काळात वहीखाते, वस्त्रे, अलंकार, भांडी, मौल्यवान वस्तू खरेदी करणे लाभदायक आहे. हा अत्यंत शुभदिवस असून, दिनमान सकारात्मक व सौम्य आहे. करडा, पांढरा, निळसर रंग आरोग्यदायक राहील. दिवसावर २, ६, ७ या अंकांचा प्रभाव राहील. पित्तप्रवृत्ती असणाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. अनिल वैद्य यांनी केले.