नागपुरात दिवाळीची उलाढाल ५०० कोटींवर : खरेदीदारांची प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 08:44 PM2019-10-29T20:44:18+5:302019-10-29T20:45:13+5:30

उपराजधानी नागपुरात सराफा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, फटाका, कपडा, मिठाई, पेंट आणि कपडा बाजारात दसरा ते दिवाळीपर्यंत ५०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल झाल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी लोकमतशी बोलताना दिली.

Diwali turnover in Nagpur at Rs 500 crore: huge crowd of buyers | नागपुरात दिवाळीची उलाढाल ५०० कोटींवर : खरेदीदारांची प्रचंड गर्दी

नागपुरात दिवाळीची उलाढाल ५०० कोटींवर : खरेदीदारांची प्रचंड गर्दी

Next
ठळक मुद्देसराफा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम क्षेत्रात उत्साह, मंदीवर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानी नागपुरात दसरा ते दिवाळीपर्यंतच्या २० दिवसात सर्वच बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी उत्साहात खरेदी केली. दिवाळीत तीन दिवसात कपडे आणि फटाक्यांच्या बाजारात पाय ठेवायला जागा नव्हती. सराफा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, फटाका, कपडा, मिठाई, पेंट आणि कपडा बाजारात दसरा ते दिवाळीपर्यंत ५०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल झाल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी लोकमतशी बोलताना दिली.
सराफा बाजारात सर्वाधिक उलाढाल
यावर्षी सराफा बाजारात सर्वाधिक उलाढाल झाल्याची माहिती आहे. नोटाबंदीनंतर रोखीचा अभाव असतानाही ग्राहकांचा बँकेच्या माध्यमातून खरेदीवर भर दिसून आला. सोने आणि चांदी खरेदी-विक्रीचा सिझन नवरात्रोत्सवापासून सुरू होतो. पण यंदा नवरात्रोत्सवापूर्वी सोन्याचे दर अचानक वाढल्यामुळे ग्राहक थांबले. पण दरदिवशी होणारी दरवाढ आणि सोने आणखी तर वाढणार नाही ना, या शक्यतेने ग्राहक घराबाहेर पडले. ग्राहक नवरात्रोत्सवात लग्नाची आणि दसऱ्यानंतर सणांची खरेदी करतात. कॅश फ्लो कमी असला तरीही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यावर्षी सराफा बाजारात मंदी नव्हतीच. लोकांनी मनमुराद खरेदी केल्याचे सोना चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले. नागपुरात मोठ्या १० शोरूम तर ३ हजारांपेक्षा जास्त लहान दुकाने आहेत. सर्व सराफांनी चांगला व्यवसाय केल्याचे त्यांनी सांगितले. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. नवरात्रोत्सवापासून सुरू असलेली सोनेखरेदी अद्यापही सुरूच आहे. वसुबारस ते भाऊबीज दररोज ग्राहकांनी वेगवेगळे मुहूर्त साधल्याने दिवाळीच्या पर्वात सराफा बाजार गजबजला होता. सोने व्यवसायातील एकूण विक्रीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नसला तरी शहरातील सराफांनी २०० कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
पाडव्याला साधला मुहूर्त
साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या दिवाळी पाडव्यालादेखील सोने खरेदीस अनन्य साधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवसापेक्षा पाडव्याला सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षा अधिक गर्दी पाडव्याला होती. या दिवशी ग्राहकांनी इतरही वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दी
यावर्षी दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारातदेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एलईडीला सर्वात जास्त मागणी असून त्या खालोखाल फ्रीज व वॉशिंग मशीनला मागणी राहिली. सोबतच एसी, मोबाईल यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
नागपुरात सर्वच मोठ्या कंपन्यांचे शोरूम आणि लहान-मोठी एक हजारापेक्षा जास्त दुकाने आहेत. सर्वत्र शून्य टक्के व्याजदरात खरेदीची सोय असल्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून दसरा ते दिवाळीदरम्यान कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. या सणांमध्ये वर्षात होणाऱ्या एकूण उलाढालीपैकी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत ५० टक्के विक्री होते. या दिवसात नामांकित कंपन्यांचे एलईडी, वॉशिंग मशीन, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, कॅमेरा, हॅण्डीकॅम, स्मार्टफोन, किचन चिमणी, मिक्सर, फूड प्रोसेसर, आयर्न, इंडक्शन, शेगडी, गिझर आदी वस्तूंसह मोबाईलची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. याशिवाय सर्वच कंपन्यांनी ग्राहकांना गिफ्ट व्हाऊचर आणि सवलतीच्या योजना दाखल केल्यामुळे ग्राहकांचा जास्त कल होता. या बाजारपेठेत ५० कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
दुचाकी आणि चारचाकींची विक्री
नागपुरात होंडा, हिरो, बजाज, टीव्हीएस, यामाहा, महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र या दुचाकी कंपन्यांसह मारुती सुझुकी, ह्युंडई, रेनॉल्ट, टाटा, होंडा, महिन्द्र, मर्सिडीज या कंपन्यांचे शोरूम आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लोक याच शोरुममधून खरेदी करतात. नवरात्रीपासून सुरू झालेली विक्री थेट दिवाळीपर्यंत सुरू असते. लोकांचा मुहूर्तावर खरेदी करण्यावर जास्त भर असतो. यावर्षी दसरा आणि दिवाळी दोन्ही सण एकाच महिन्यात आल्यामुळे सर्वच विक्रेत्यांची दिवाळी जोरात झाली. नागपुरात दर महिन्याला चार हजारांपेक्षा जास्त दुचाकी तर एक हजारापेक्षा जास्त चारचाकींची विक्री होते. पण यंदाच्या दसरा आणि दिवाळीत सहा हजारांपेक्षा जास्त दुचाकी आणि दोन हजारांपेक्षा जास्त चारचाकींची विक्री झाल्याची माहिती ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. यामध्ये हिरो, होंडा, बजाज या दुचाकींची आणि मारुती सुझुकी, ह्युंडई या दोन कंपन्यांच्या खालोखाल टाटा, रेनॉल्ट आणि हिरो कंपन्यांच्या कारची विक्री झाली आहे. या बाजारपेठेची उलाढाल १०० कोटींपेक्षा जास्त झाल्याची माहिती आहे.
फटाका बाजारात ५० कोटींवर उलाढाल
यावर्षी पावसानंतरही फटाका बाजारात उत्साह कायम होता. विदर्भाची मुख्य बाजारपेठ नागपुरात ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याची माहिती आहे. नागपुरात १० पेक्षा जास्त मोठे विक्रेते आणि ५०० पेक्षा जास्त किरकोळ विक्रेते आहेत. ही बाजारपेठ मुख्यत्वे चार ते पाच दिवसांची असते. लक्ष्मीपूजनाला सर्वाधिक विक्री होते. या दिवशी मोठ्या दुकानांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती.
ग्रीन फटाक्यांसाठी उत्पादन डिसेंबर ते मार्चपर्यंत चार महिने बंद असतानाही वाढ झाली. तामिळनाडू राज्यातील शिवाकाशीमध्ये ९९ टक्के फटाक्यांचे उत्पादन होते. परसराम फायर वर्क्सचे संचालक ललित कारवटकर म्हणाले, यावर्षी लक्ष्मीपूजनला दीड तास पाऊस आल्यामुळे पुन्हा खरेदीसाठी येणारे ग्राहक आले नाहीत. यावर्षी लोकांचा खरेदीचा उत्साह चांगला होता. कुठेही मंदी दिसली नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे फटाक्यांची खरेदी केली.
घर खरेदीतही १०० कोटींची उलाढाल
बांधकाम क्षेत्रात असलेली मंदी गेल्यावर्षीपासून दूर झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम क्षेत्रावर सरकारचे नियंत्रण आल्याने लोकांची घर खरेदी करताना होणारी फसवणूक थांबली आहे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास बळावला आहे. दिवाळीत या क्षेत्रात १०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल झाल्याची माहिती आहे. क्रेडाई नागपूर मेट्राचे अध्यक्ष महेश साधवानी म्हणाले, क्रेडाई नागपूर मेट्रोचे २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत. सर्वांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांनी आवडत्या प्रकल्पातील घराची पाहणी केली आणि नोंदणी केली. अनेकजण सोईनुसार आणि घराची किंमत पाहून नवीन घराची खरेदी करीत आहेत. ग्राहकांचा घरखरेदीकडे कल वाढल्यामुळे बिल्डर्सही आनंदी आहे. पुढे पुढे या क्षेत्रात उत्साह संचारणार आहे.
कापड बाजारातही उत्साह
सण-उत्सव म्हटले म्हणजे गरीब-श्रीमंत प्रत्येकजण नवीन कपडे खरेदीला पसंती देत असतो. त्यानुसार दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात नवीन कपड्यांची खरेदी होऊन कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. दिवाळीत दुकाने, शोरूम,मॉल रात्रीपर्यंत खुले होते.
सर्वच बाजारपेठांमध्ये मंदीवर मात
यावर्षी आर्थिक मंदीवर कोट्यवधींच्या उलाढालीने मात केली. तोरणे, कंदील, पणत्या, शोभिवंत वस्तू, रांगोळी, फराळ, सुका मेवा, मिठाई कपडे यांची रेलचेल आणि हे खरेदी करण्यासाठी बाजारांमध्ये तितकीच गर्दी उसळलेली दिसली. लोकांनी नव्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला.

 

Web Title: Diwali turnover in Nagpur at Rs 500 crore: huge crowd of buyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.