दगडी चाळ पाडण्याआधी ‘डॅडी’ साजरी करणार दिवाळी
By योगेश पांडे | Published: October 30, 2023 06:08 PM2023-10-30T18:08:05+5:302023-10-30T18:08:29+5:30
दसरादेखील यंदा कुटुंबियांसोबतच
नागपूर : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याची दिवाळीदेखील यंदा मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळीत होणार आहे. विशेष म्हणजे त्याची दगडी चाळीतील ही अखेरची दिवाळी ठरण्याची शक्यता आहे. कारण लवकरच दगडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत.
१९ ऑक्टोबर रोजी अरुण गवळीची फर्लोवर सुटका झाली होती. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी तो मुंबईत पोहोचला. मुंबईत पोहोचल्या पोहोचल्या त्याने जनसंपर्क सुरू केला. फर्लोवर २८ दिवसांसाठी बाहेर आलेल्या गवळीने दगडी चाळीत नवरात्रोत्सवातदेखील उपस्थित लावली होती व घरी कुटुंबियांसह दसरा साजरा केला होता. या चाळीतील नवरात्रोत्सवाचे पन्नासावे वर्ष होते व त्यामुळेच गवळीने फर्लोसाठी पुर्ण प्रयत्न केले होते. गवळीचे देवी दर्शनाचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या २८ दिवसांत अरुण गवळीच्या घरी अनेक नियोजित बैठका आहेत. त्यात पुनर्विकास प्रकल्प, बिल्डर, काही राजकीय पदाधिकारी यांच्याशी बैठकांचादेखील समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अरुण गवळी याने फर्लोसाठी नागपूर कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. मात्र, त्याला संचित रजा दिल्यास मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण होऊ शकते, असे कारण देत सुटीचा अर्ज नामंजूर केला. त्यावर गवळीचा आक्षेप होता. कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचा दावा करीत गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.