अपंगाचे साहित्य समाजातील दु:खाशी लढण्याची प्रेरणा देणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:55 PM2018-11-23T22:55:06+5:302018-11-23T22:57:55+5:30
नागपुरात १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय अंध व अपंगांचे समाजोत्थान साहित्य व कला संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक अनंत विष्णू ढोले यांची निवड करण्यात आली होती. दोन दिवसीय या संमेलनात अपंगाचे साहित्य, त्यांच्या कला यांचे सादरीकरण झाले. या संमेलनातून अपंगाच्या प्रगतीसाठी १९ ठराव घेण्यात आले. अपंगांचे साहित्य संमेलन असले तरी, सामान्यांनीही या संमेलनाला प्रचंड प्रतिसाद दिला. या संमेलनाच्या पाश्वभूमीवर संमेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले यांची विशेष मुलाखत....
मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय अंध व अपंगांचे समाजोत्थान साहित्य व कला संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक अनंत विष्णू ढोले यांची निवड करण्यात आली होती. दोन दिवसीय या संमेलनात अपंगाचे साहित्य, त्यांच्या कला यांचे सादरीकरण झाले. या संमेलनातून अपंगाच्या प्रगतीसाठी १९ ठराव घेण्यात आले. अपंगांचे साहित्य संमेलन असले तरी, सामान्यांनीही या संमेलनाला प्रचंड प्रतिसाद दिला. या संमेलनाच्या पाश्वभूमीवर संमेलनाध्यक्ष अनंत विष्णू ढोले यांची विशेष मुलाखत....
प्रश्न : अपंगाचे संमेलन का गरजेचे आहे ?
ढोले : अपंग व्यक्ती जसा समाजात, सरकार दरबारी उपेक्षित आहे तसाच तो साहित्य आणि कला क्षेत्रातही उपेक्षित आहे. सामान्यांच्या मंचावर, संमेलनामध्ये प्रतिभा असतानाही अपंगांना संधी मिळत नाही. मुळात अपंगांचे साहित्य हे समाजातील दु:खाशी लढण्याची प्रेरणा देणारे आहे. कारण अपंगत्व आल्याने घरदारं, कुटुंब उद्ध्वस्त होते. सगळ्यात जास्त त्रास त्या व्यक्तीला व त्याच्या जवळच्या नातलगांना होतो. शारीरिक वेदना काही काळाने सुसह्य होतात पण हतबलता जेव्हा मनाचा ताबा घेते तेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने अपंग होते. मग या वेदनेच्या अभिव्यक्तीतून, दु:खाच्या सृजनातून ज्या कविता, कथा, नाटकं वाङ्मय रचले जाते ते अपंग साहित्य असते. स्वत:च्या मनाला रिझवता रिझवता, इतरांच्या मनाला जे रिझवायला लागते ती कला अपंगांची असते. अशा साहित्य कलेचे प्रदर्शन हे अपंगाच्या साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट असते. अपंगांच्या वेदना, दु:ख जर सामान्यांच्या संमेलनातून व्यक्त होण्याची संधी मिळत नसल्यामुळे अपंगाचे संमेलन गरजेचे आहे.
प्रश्न : अपंगांच्या संमेलनातून सामान्यांना वेदनेची जाणीव कशी होणार?
ढोले : मराठी साहित्यात अनेक साहित्य प्रवाह असून, ते सतत आपापली बौद्धिक व सामाजिक भूमिका मांडत आलेले आहेत. यात मुस्लीम साहित्य, पुरोगामी साहित्य, परिवर्तनवादी साहित्य अशा साहित्य प्रवाहातून जगण्याचे संदर्भ देत साहित्य फुलत आहे. पण अतिशय खडतर जीवनशैलीतून जगण्याची कला शिकविणारे, जगण्याचे मर्म सांगणारे वास्तववादी साहित्य फक्त अंध अपंगांनीच निर्माण केले आहे. याची ग्वाही पु.ल. देशपांडे यांनी जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दिली आहे. त्यामुळे तिसºया राज्यस्तरीय अपंग व अंध साहित्य व कला संमेलनात अपंगांचे साहित्य, त्यांच्या कला याची जाणीव सामान्यांना करून देण्यासाठी आमंत्रितांपासून निमंत्रितांपर्यंत सामान्यजण होते. आम्हाला आमच्या साहित्याला, कलेला अपंगांची पावती नको, सामान्यांचा आधार, प्रोत्साहन हवे आहे. पहिल्यांदा या साहित्य संमेलनातून याची जाणीव आम्ही सामान्यांना करून दिली आहे.
प्रश्न : संमेलनात शासनाचा सहभाग असावा का?
ढोले : अगदी, ही अपंगांसाठी आनंदाची बाब ठरेल. पण तसे होत नाही. सामाजिक न्याय विभाग अपंगांचे साहित्य संमेलन भरविते पण यावर्षी त्याला खीळ बसली. त्यामुळे अपंग क्षेत्रात कार्य करणाºया सामाजिक संस्थेला पुढाकार घ्यावा लागला. अपंगांच्या बाबतीत सहानुभूती ठेवणाºया काही दानशुरांची मदत मिळाली. संमेलन यशस्वी झाले. अपंगांचे संमेलन हे शारीरिक व मानसिक वेदनेतून निर्माण झालेल्या साहित्याचे आहे. अपंगांच्या जीवनातील हा अंधकार मिटावा, यासाठी सरकारला काही सुधारणा व कायदे करावे लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून या संमेलनातून १९ ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून सरकार दरबारी हे ठराव पोहचविण्याची जबाबदारी आमदार प्रकाश गजभिये यांनी घेतली. त्यामुळे आमच्या संमेलनात सरकार सहभागी नसले तरी, येथे व्यक्त झालेल्या वेदना, दु:ख सरकारपर्यंत नक्कीच पोहचणार आहे.
प्रश्न : साहित्य संमेलनातून संमेलनाध्यक्ष म्हणून उद्दिष्ट साध्य झाले असे वाटते का?
ढोले : अपंगांच्या आयुष्यात अनेक बदल घडायला हवे आहे. सर्व प्रकारच्या अपंगांना रोजगार, कुटुंब पालनपोषणाची हमी, अपंगांना विम्याचे संरक्षण, सभागृहापासून मॉलपर्यंत किंवा शासकीय कार्यालयामध्ये पोहचण्याची सोय नाही. वर्तमानपत्र, न्यायालयाच्या निर्णयातून मनावर फुंकर घालण्याचा आभास निर्माण होतो. पण अपंगांनी एक पाऊल पुढे सरकायचा प्रयत्न केला तरी अपंग अडून जातो. आम्ही कुठे अडतोय, हे सामान्यांना जाणवून द्यायचे आहे. त्यामुळे संमेलनात सामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी उद्घाटनापासून समारोपापर्यंत हा समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि तो यशस्वी ठरला असे मला वाटते आहे.