दिव्यांग मनपावर धडकल : एकाने घेतले अंगावर रॉकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:10 PM2020-02-24T23:10:30+5:302020-02-24T23:11:22+5:30
अतिक्रमण कारवाईत गांधीबाग येथील एका दिव्यांगाचे दुकान हटविले. यामुळे दिव्यांगांनी सोमवारी महापालिका मुख्यालयापुढे नारेबाजी करून धरणे दिली. एकाने अंगावर रॉकेल घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात काही दिव्यांगांची दुकाने हटविण्यात आली. सोमवारी महापौर दिव्यांगांची बैठक घेणार होते. परंतु त्यापूर्वीच अतिक्रमण कारवाईत गांधीबाग येथील एका दिव्यांगाचे दुकान हटविले. यामुळे दिव्यांगांनी सोमवारी महापालिका मुख्यालयापुढे नारेबाजी करून धरणे दिली. एकाने अंगावर रॉकेल घेतले. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. दिव्यांगांनी गोधळ घातल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी उपायुक्त महेश मोरोणे यांना दिव्यांगासोबत चर्चेसाठी बोलावले.
गांधीबाग बगिचा लगत मागील २० वर्षापासून चहाचे दुकान लावणाऱ्या दिव्यांगाचे दुकान तोडण्यात आले. सोमवारी बैठक आयोजित केली असताना अतिक्रमण पथकाने कारवाई करायला नको होती. अशी भूमिका गिरधर भजभुजे यांनी मांडली. जोपर्यंत पर्याय व्यवस्था होत नाही. तोपर्यंत कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन महेश मोरोणे यांनी दिव्यांगांना दिले.