डीजेचा आवाज बंद !
By Admin | Published: September 25, 2015 03:35 AM2015-09-25T03:35:52+5:302015-09-25T03:35:52+5:30
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठमोठे डीजे लावणारी मंडळे स्वत:वर ‘विघ्न’ ओढवून घेणार आहेत.
वाहनांवर कारवाई होणार : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
नागपूर : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मोठमोठे डीजे लावणारी मंडळे स्वत:वर ‘विघ्न’ ओढवून घेणार आहेत. वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार करून डीजे सेट बसवून ध्वनिप्रदूषणाबाबत मानदंडाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी वाहतूक पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) दिले आहेत.
दिवसेंदिवस वाढत असलेले ध्वनिप्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होत असलेला दुष्परिणाम आता एक समस्या झाली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने डीजे सेटद्वारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील कारवाईबाबत निर्णय दिला आहे.
त्यानुसार वाहनांमध्ये अनधिकृतपणे फेरफार करून डीजे सेट बसविणाऱ्या तसेच याद्वारे कर्णकर्कश्श संगीत वाजवून ध्वनिप्रदूषणबाबात मानदंडाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यात यावी, असे आदेश परिवहन आयुक्तांनी एप्रिल २०१५ मध्ये दिले होते. दोषी वाहनमालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ५२ तसेच १९० (२) या प्रमाणे कारवाई करण्याची, तसेच क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १३३ प्रमाणे संबंधित प्रकरण स्थानिक पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्याची, या शिवाय परवाना निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गणेशोत्सवानिमित्ताने घेतलेल्या नुकत्याच एका बैठकीत डीजे वाजविताना होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण असावे, यावर लक्ष वेधत वाहनांची तपासणी करून दोषी वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)