संशोधनाद्वारे डी.लिट., डीएसस्सीला नागपूर विद्यापीठाची ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:41 AM2018-11-23T01:41:41+5:302018-11-23T01:42:35+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे. यापुढे केवळ मानद उपाधीच देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यापीठातर्फे लवकरच निर्णय जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे. यापुढे केवळ मानद उपाधीच देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यापीठातर्फे लवकरच निर्णय जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यातील इतर मोठ्या विद्यापीठांनी संशोधनाद्वारे मिळणारी ‘डी.लिट.’ तसेच ‘डीएसस्सी’ या पदव्या बंद केल्या आहेत. नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातदेखील दोनपेक्षा अधिक मानद उपाधी देऊ नये अशी तरतूद आहे. सद्यस्थिती या दोन्ही पदव्यांसाठी विद्यापीठाकडे २५ हून अधिक प्रस्ताव आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून हे प्रस्ताव आले आहेत.
‘पीएचडी’ झालेले संशोधक हे त्याच विषयामध्ये आणखी काही विशेष संशोधन करून या पदव्यांसाठी पदवीसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवितात.
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार संशोधनाद्वारे ‘डी.लिट’ आणि ‘डी.एसस्सी’ या पदव्या देण्यासंदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही. त्यानुसार त्याची तपासणी करून या पदव्या देण्यात येतात. मात्र विद्यापीठ कायद्यानेच याला बंधने घातल्याने नागपूर विद्यापीठ लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे यापुढे केवळ विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींनाच मानद उपाधी प्रदान करण्यात येईल, असा विद्यापीठ विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितले.