‘डीएमईआर’चे विभागीय कार्यालय नागपुरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 07:00 AM2021-10-09T07:00:00+5:302021-10-09T07:00:06+5:30
Nagpur News वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सक्षमीकरण करण्यासाठी राज्यात दोन ठिकाणी विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजुरी मिळाली. यातील एक कार्यालय नागपुरात, तर दुसरे औरंगाबाद येथे होणार आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सक्षमीकरण करण्यासाठी राज्यात दोन ठिकाणी विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजुरी मिळाली. यातील एक कार्यालय नागपुरात, तर दुसरे औरंगाबाद येथे होणार आहे. याला डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दुजोरा दिला. (DMER's divisional office in Nagpur!)
राज्यात १९ शासकीय महाविद्यालय व रुग्णालये कार्यरत आहेत. येथील प्रवेश क्षमता वाढली असून विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, कर्मचारी व रुग्णसेवेच्या संदर्भातील अनेक प्रश्न रेंगाळत चालले आहे. यातच बहुसंख्य महाविद्यालयातील अधिष्ठात्यांचा कार्यभार अतिरिक्त आहे. यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी ‘डीएमईआर’कडे बोट दाखविले जात असल्याने प्रलंबित प्रकरणे वाढत चालली आहेत. राज्यात दोन ठिकाणी विभागीय कार्यालय सुरू झाल्यास कामाची विभागणी होऊन समस्या तातडीने सोडविण्यास मदत होईल. याचा फायदा महाविद्यालयाच्या विकासासोबतच रुग्णसेवेतील गुणवत्ता वाढविण्यास होणार असल्याने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विभागीय कार्यालयांना मान्यता देण्यात आली.
-विभागीय कार्यालयासाठी पदे भरणार
राज्यात ‘डीएमईआर’ची दोन विभागीय कार्यालये सुरू करण्यासाठी २२ नियमित पदे निर्माण करण्यालाही परवानगी देण्यात आली आहे. ६ डाटा एंट्री ऑपरेटर व लिपिक यांच्यासेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. या पदांच्या वेतनासाठी २ कोटी ९ लाख ४६ हजार ४४८ इतक्या वार्षिक खर्चास तसेच दोन कार्यालयांसाठी २० लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
- आता वैद्यकीय शिक्षण विभागातही आयुक्त
आरोग्य विभागासारखे आता वैद्यकीय शिक्षण विभागातही आयुक्तपदाला मान्यता मिळाली आहे. या पदावर विरेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. सिंह यांच्याकडे दोन विभागीय कार्यालले स्थापन करण्यापासून तेथील पदे भरण्याची व कामकाजाची जबाबदारी असणार आहे.
-मेडिकलमध्ये असणार नागपुरातील विभागीय कार्यालय
सुत्रानूसार, राज्यातील दोन विभागीय कार्यालयांपैकी एक कार्यालय नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) होणार आहे. यामुळे विदर्भातील मेडिकल कॉलेजच्या समस्या निकाली निघण्याची शक्यता बळावली आहे.