डीएनए फिंगरप्रिन्टने लावता येईल आजारांचे अचूक निदान : डीजी शेखर मांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:17 PM2018-10-26T22:17:58+5:302018-10-26T22:20:00+5:30
कौन्सिल आॅफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर)चे नवनियुक्त महासंचालक (डीजी) डॉ. शेखर मांडे यांनी शुक्रवारी नीरी संस्थेला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेच्या नवीन संशोधनाविषयी माहिती दिली. सीएसआयआरने डीएनए फिंगरप्रिन्टचे नवे मॉडेल (मार्कर्स) विकसित केले आहे. या मार्कर्समुळे कोणत्याही व्यक्तीला होणाऱ्या आजारांचे अचूक निदान करता येईल, अशी माहिती डॉ. मांडे यांनी यावेळी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौन्सिल आॅफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर)चे नवनियुक्त महासंचालक (डीजी) डॉ. शेखर मांडे यांनी शुक्रवारी नीरी संस्थेला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेच्या नवीन संशोधनाविषयी माहिती दिली. सीएसआयआरने डीएनए फिंगरप्रिन्टचे नवे मॉडेल (मार्कर्स) विकसित केले आहे. या मार्कर्समुळे कोणत्याही व्यक्तीला होणाऱ्या आजारांचे अचूक निदान करता येईल, अशी माहिती डॉ. मांडे यांनी यावेळी दिली.
डॉ. शेखर मांडे यांचे शिक्षण नागपूरला झाले असून विविध संस्थांमध्ये कार्य करीत ते या महत्त्वाच्या संस्थेत सर्वोच्च पदावर पोहचले आहेत. विज्ञान, संशोधक आणि सामान्य माणसांना एकत्र करून संशोधन संस्थेचे कार्य अधिक लोकाभिमुख करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिक अनेक आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. यासाठी सीएसआयआरने डीएनए फिंगरप्रिन्ट मार्कर्स विकसित केले असून याद्वारे डायबिटीज, हार्ट डिसीज असे कॉमन आजार होण्याबाबत अचूक निदान करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. वातावरणातील वायु प्रदूषणाबाबत अचूक माहिती मिळविण्यासाठी संस्थेचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान उपयोगी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. एआयच्या मॉनिटरींग बोर्डद्वारे सध्या वातावरणात प्रदूषणाची पातळी किती आहे, याची माहिती घेण्यासह भविष्यात प्रदूषणाचे प्रमाण कसे असेल, याबाबतही अनुमान लावणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेने मांडलेल्या सुलभ शौचालयाच्या संकल्पनेमुळे देशभरात चांगले परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजवर प्रभावी नियंत्रणासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलप्रदूषण आणि वायुप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी सीएसआयआर, नीरी संस्थेतर्फे अनेक प्रकारचे संशोधन केले जात आहे व संकल्पना राबविल्या जात आहेत. मात्र हे संशोधन जनमानसांपर्यंत पोहचत नाही. त्यासाठी शासनाच्या मदतीने हे संशोधन अधिक लोकाभिमुख करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार आणि डॉ. सुदीप कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
गंगासफाईची मोहीम अधिक व्यापक होणार
गंगासफाई अभियानात गेल्या अनेक महिन्यांपासून संशोधन सुरू आहे. यामध्ये सीएसआयआरसह नीरीचाही सहभाग आहे. आतापर्यंत केलेल्या मॉनिटरींगनंतर आता या कामाला वेग येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत नदीला प्रदूषित करणारे नाले व प्रदूषणाच्या इतर स्रोतांच्या स्वच्छतेवर अधिक फोकस करण्यात येणार असल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले. नदी स्वच्छतेसाठी आमचे सर्वोच्च प्रयत्न सुरू आहेत, मात्र परिणाम यायला वेळ लागेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
नागपुरातही सुरू होणार नाले स्वच्छता
नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले, शहरातील नागनदीसह सहा नाल्यांचे मॉनिटरींग नीरीने केले होते. त्यापैकी एका नाल्याच्या स्वच्छतेची योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहारातील सांडपाणी व नागनाल्याचे पाणी वाहून गोसेखुर्द प्रकल्पात जात असल्याने तेथील पाण्यात प्रदूषण वाढले आहे. याबाबत माहिती देताना डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले, स्वच्छता प्रकल्पाचा केवळ एक भाग नीरीकडे आहे. त्यातही प्रशासकीय दिरंगाई आड येत आहे. श्रावण हार्डीकर मनपा आयुक्त असताना नीरीने प्रोजेक्ट सादर केले होते. त्यानंतर प्रत्येक आयुक्तांसमोर हा प्रकल्प सादर केला आहे, मात्र त्यास अद्याप मान्यता मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.