कमिटमेंट करो तो पॉझिटिव्ह करना! ‘जिंदा टायगर’ बघून हरखले नागपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:12 AM2018-01-07T00:12:10+5:302018-01-07T00:16:14+5:30

सलमान खान... कुणाचा सुलतान तर कुणाचा भाईजान....५२ वर्षांचा हा दबंगस्टार जिथे जातो तिथे लाटा उसळतात गर्दीच्या...या ‘हाय टाईड’मध्ये काय बालक, काय तरुण, काय महिला अन् काय वृद्ध...साºयांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो... शनिवारी नागपुरातही सलमान नावाचे हे देखणे वादळ धडकले अन् खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या पहिल्यावहिल्या प्रयत्नाला अविस्मरणीय करून गेले.

Do commitments, make positive! Seeing 'Jinda Tiger ' Nagpurian excited | कमिटमेंट करो तो पॉझिटिव्ह करना! ‘जिंदा टायगर’ बघून हरखले नागपूरकर

कमिटमेंट करो तो पॉझिटिव्ह करना! ‘जिंदा टायगर’ बघून हरखले नागपूरकर

Next
ठळक मुद्दे खासदार सांस्कृतिक महोत्साचे रंगारंग उद्घाटन

ऑनलाईन लोकमत
नागपूर : सलमान खान... कुणाचा सुलतान तर कुणाचा भाईजान....५२ वर्षांचा हा दबंगस्टार जिथे जातो तिथे लाटा उसळतात गर्दीच्या...या ‘हाय टाईड’मध्ये काय बालक, काय तरुण, काय महिला अन् काय वृद्ध...सा ऱ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो...
शनिवारी नागपुरातही सलमान नावाचे हे देखणे वादळ धडकले अन् खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या पहिल्यावहिल्या प्रयत्नाला अविस्मरणीय करून गेले. क्रीडा चौकाच्या इतिहासात गर्दीची विक्रमी नोंद झाली. सलमान येणार म्हणून दुपारी ४ पासूनच नागपूरकरांचे जत्थे ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाले होते. तब्बल चार तास ते डोळ्यात प्राण आणून या लाडक्या अभिनेत्याची प्रतीक्षा करीत होते. अखेर रात्री ८ च्या ठोक्याला निळी जीन्स, गर्द निळे शर्ट आणि त्यावर काळे जॅकेट घातलेला गोरापान सलमान स्टेजवर आला आणि सर्वदूर एक नजर फिरवत म्हणाला...‘लगता हैं पूरा नागपूर यहां आया हैं’ त्याच्या या वाक्याचे नागपूरकरांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्वागत केले. गर्दीचा हा उच्चांक बघून सलमानही आपल्या ‘सुपरस्टार मोड’मध्ये आला आणि त्याने खास स्टाईलमध्ये जोरदार डायलॉगबाजी सुरू केली. नेहमी पडद्यावर दिसणारा सलमान प्रत्यक्ष समोर डायलॉग म्हणतोय हे बघून तरुणाई इतकी उत्साहित झाली की मधले सारे अडथळे पार करून ती थेट मंचासमोर पोहोचली. जवळ आलेल्या या तरुणाईला उद्देशून सलमान म्हणाला,‘कमिटमेंट करो तो पॉझिटिव्ह करना, निगेटिव्ह मत करना. जिसको जरुरत हो उसपर एहसान करो, लेकीन कोशीश ये हो की खुद को कभी किसी का एहसान ना लेना पडे.’
‘ढिंक चिका’वर थिरकाला भाईजान
जोरादार डायलॉगबाजी झाल्यावर सलमानने ‘ढिंक चिका’ गायला सुरुवात केली. या गाण्यावर तरुणाई तूफान नाचतेय हे बघून सलमाननेही ‘बारा महिने मे बारा तरीके से...तूझ से प्यार जताऊंगा रे...’ म्हणत जोरादार फेर धरला. ‘मै हूं हिरो तेरा...’हे गाणेही सादर करून त्याच्या आत लपलेल्या गायकाची झलक त्याने नव्याने दाखवून दिली.
सलमान हा संवेदनशील समाजसेवक
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सलमान खानचा नागपूरकरांच्या वतीने सत्कार केला. सलमान खान हा केवळ अभिनेता नाही तर त्याच्यात एक संवेदनशील व्यक्ती दडला आहे. त्याच्यामुळे अनेक गरीब मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याने अनेक गरीब कुटुंबांच्या मागे उभे राहत वंचितांना आधार दिला आहे. तो केवळ आदर्श अभिनेता नसून संवेदनशील समाजसेवकदेखील आहे. हीच बाब सलमानला आणखी मोठी करते, असे गौरवोद्गार गडकरी यांनी यावेळी काढले. खासदार सांस्कृतिक महोत्सव हा जनतेचा उत्सव आहे. याचे उद्घाटन करण्यासाठी सलमानने लगेच होकार दिला, असेदेखील यावेळी गडकरी यांनी सांगितले.
सलमानला ‘ब्रेसलेट’ची भेट
उद्घाटनानंतर नितीन गडकरी यांनी नागपूरकरांच्यावतीने सलमान खान व सुदेश भोसले यांचा विशेष सत्कार केला. सलमानला गडकरी यांनी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. सलमान खानच्या ‘ब्रेसलेट’ची तरुणाईमध्ये प्रचंड ‘क्रेझ’ आहे. गडकरी यांनी सलमानला शानदार ‘ब्रेसलेट’ भेट म्हणून दिले. विशेष म्हणजे त्यांनी ते सलमानच्या हातात घातले व त्यानेदेखील या भेटीचा अतिशय आनंदाने स्वीकार केला. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे देखील उपस्थित होते.
मान्यवरांची उपस्थिती
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाला शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती. ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, खा. विकास महात्मे, माजी खासदार दत्ता मेघे, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ.समीर मेघे, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सामाजिक कार्यकर्ता गिरीश गांधी, नगरेसवक संदीप गवई, जयप्रकाश गुप्ता, पं.दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ.विरल कामदार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
फक्त ‘सलमान...सलमान...’
खासदार महोत्सवाच्या उद्घाटनाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. सायंकाळी ५ वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी नागरिक एकत्र होण्यास सुरुवात झाली होती. सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी नागरिक बेचैन झाले होते. सलमान खान आल्यानंतर तर संपूर्ण परिसर ‘सलमान...सलमान...या आवाजाने दुमदुमून गेला. सलमाननेदेखील सर्व चाहत्यांना भरभरून प्रतिसाद दिला. सलमान खानला बघण्यासाठी ‘यंगिस्तान’सोबतच लहानगे आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येदेखील जोरदार उत्साह दिसून आला.
चल बेटा सेल्फी ले ले रे !
सलमान खानला नजरेसोबतच कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी उपस्थितांचा आटापिटा सुरू होता. अनेकांनी तर मंचासमोर तर काहींनी चक्क ‘स्क्रीन’समोरच ‘सेल्फी’ घेऊन मनाचे समाधान करून घेतले.
ट्यूबलाईट भी देख लेते यार
टायगर जिंदा हैं कितने लोगो ने देखी, असे सलमानने विचारताच उपस्थित सर्वांनीच आपले हात वर केले. या चित्रपटाने १५० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवून दिल्याने सलमान आपल्याला थँक्स म्हणेल, अशी या सर्वांची अपेक्षा होती. पण, सलमानने हात वर करून असलेल्या गर्दीवर एक तिरपा कटाक्ष टाकला आणि म्हणाला, ट्यूबलाईट भी देख लेते यार तो मजा आ जाता. सलमानच्या या अनपेक्षित वाक्याने अनेकांना हसू आवरले नाही.
‘शेरा’ने वेधले लक्ष
सलमान खानसोबत त्याचा अंगरक्षक शेरा हा सावलीसारखा असतो. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनालादेखील शेरा सलमानच्या पाठीमागेच होता. शेराची लोकप्रियता नागपुरातदेखील अनुभवायला मिळाली. अनेक उत्साही तरुणांनी तर ‘शेरा’च्या नावाचादेखील घोष केला.
सुदेश, शावा शावा अन् मस्ती भरी रात
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन होण्याआधी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांचे गीतगायन रंगले. बिग बींच्या हुबेहूब आवाजात गाणाऱ्या या गुणी गायकाने आपल्या खास शैलीतील गीताने नागपूरकरांना जिंकले. मेरे मेहबूब कयामत होगी...हे गीत गातच सुदेश भोसले मंचावर आले. नागपूरकर गायक सारंग जोशी, श्रृती आणि पल्लवी यांच्या संगतीने त्यांची ‘सिंगिंग एक्स्प्रेस’ पुढचे दोन तास तुफान धावली. रहने दो छोडो भी...., इंतेहा हो गई इतजार की...ही बॉलिवूडच्या सोनेरी काळातील गीते सादर केल्यावर सुदेश भोसले खास अमिताभच्या आवाजातील शावा-शावावर आले. मेरी मखना, मेरी सोनीये...हे गीतही त्यांनी अफलातून सादर केले. जहां तेरी ये नजर हैं...मच गया शोर सारी नगरी रे...,ये कहां आ गये हम....मस्ती भरी रात हैं....या गाण्यांचे सादरीकरण निव्वळ अप्रतिम होते. शराबी चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि ओमप्रकाश यांच्या आवाजातील मिमिक्रीवर श्रोते लोटपोट झाले. शेवटी वेगवान मेडलीने सुदेश भोसले यांनी श्रोेत्यांचा निरोप घेतला. कार्यक्रमाचे संचालन बाळ कुळकर्णी, रेणुका देशकर आणि अमोल शेंडे यांनी केले.

Web Title: Do commitments, make positive! Seeing 'Jinda Tiger ' Nagpurian excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.