माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:20 AM2017-10-17T00:20:14+5:302017-10-17T00:20:59+5:30
विरोधक समोरचा असेल तर कधीही चालतो. पण पक्षांतर्गत माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विरोधक समोरचा असेल तर कधीही चालतो. पण पक्षांतर्गत माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. मात्र, पक्षशिस्त असलीच पाहिजे. माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा. माझ्याकडे येऊन करा. आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा. निकाल द्या. मग इतर बाबींचे बोला, असे खडेबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सुनावले.
नांदेड महापालिकेतील विजयानंतर खा. अशोक चव्हाण यांचे सोमवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. या वेळी त्यांचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश यांच्यासोबत ते यवतमाळसाठी रवाना झाले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांंनी पक्षांतर्गत गटबाजीवर कटाक्ष केला. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करीत काही नेत्यांनी दिल्लीत त्यांची तक्रार केली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी स्वत: गट-तट मानत नाही. पक्षांतर्गत बाबींवर चर्चेतून मार्ग निघू शकतो. मी पदावर असेपर्यंत पक्ष बळकट करण्यावरच भर देणार. माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. मला निकालात रस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. भाजपाने देशभरात सत्तेसाठी पळवापळवीचे उद्योग केले. पक्षांतर बंदी कायदा तर धुडकावून लावला. आता तेच शिवसेना करीत आहे. हे प्रकार लोकशाहीसाठी मारक आहेत. अजित पवार यांनी केलेल्या प्रशंसेबाबत विचारले असता ते म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात पवार हे मंत्री होते. भाजपाचा सफाया झाल्याचा त्यांना आनंद झाला आहे. ही चांगली बाब आहे.
नागपुरात नेत्यांचे समीकरण बसविणार
नागपुरातही नेत्यांचे समीकरण बसविता आले असते तर मला अधिक आनंद होईल. गरज भासली तर त्यासाठी पुढाकार घेण्याची आपली तयारी आहे. मला कुणालाही प्रमोट करायचे नाही किंवा कुणाचीही बाजू घ्यायची नाही. नागपुरात गटबाजीचा इतिहास फार जुना आहे. कोणत्याही प्रदेशाध्यक्षासाठी हे काही नवीन नाही. कुणाची नाराजी असेल तर त्यांनी आपल्याशी चर्चा करावी. आपण चर्चेला सदैव तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचा परतीचा प्रवास सुरू
गेल्या निवडणुकीच्या वेळी देशात मोदी लाट होती. भाजपाने केलेल्या अपप्रचाराला व दिलेल्या खोट्या आश्वासनांना जनता बळी पडली. मात्र, आता काँग्रेस बरी असल्याची जाणीव लोकांना झाली आहे. नांदेड, गुरुदासपूरच्या निकालाने लोकांना काँग्रेसकडून अपेक्षा असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, भाजपाचा सामना करण्यासाठी काँग्रेसला जोरात तयारी करावी लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी, महागाई आदी मुद्यांवर सामान्य जनता त्रस्त आहे. ज्या गुजरातने भाजपाला डोक्यावर घेतले होते तेथील व्यापारी आता रस्त्यावर उतरले आहेत. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
आणीबाणी लावण्याचा प्रयत्न
सोशल मीडियाला हाताशी धरून भाजपा सत्तेवर आली. आता तेच हत्यार त्यांच्यावर उलटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बंदी घालून अप्रत्यक्षपणे आणीबाणी लावण्याचे प्रयत्न होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.
नागपुरात जंगी स्वागत
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी चव्हाण यांचा जयघोष करण्यात आला. अनंतराव घारड, प्रदेश सरचिटणीस डॉ. बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, मुन्ना ओझा, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी, संजय महाकाळकर, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, दीपक वानखेडे, गिरीश पांडव, राकेश पन्नासे, कमलेश चौधरी, बंटी शेळके, विवेक निकोसे, आकाश तायवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर चव्हाण रविभवन येथे आले असता तेथेही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मॉर्निंग वॉक क्लब व ज्येष्ठ नागरिक मंडळानेही काँग्रेसच्या विजयासाठी चव्हाण यांचे स्वागत केले. इतर पक्षातील काही कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.