गुंडांच्या दहशतीचे ना सावट ना भीती
By admin | Published: November 12, 2014 12:56 AM2014-11-12T00:56:24+5:302014-11-12T00:56:24+5:30
आता येथील आकाश स्वच्छ आहे. अंगण मोकळे आहे. ना गुंडाच्या दहशतीचे सावट ना अत्याचाराची भीती. आता इकडेही महिला-मुली मोकळेपणाने फिरू शकतात. छोटी मुलं रस्त्यावर खेळू शकतात.
कस्तुरबा नगर निवांत : आता येथील आकाश स्वच्छ आहे
नागपूर : आता येथील आकाश स्वच्छ आहे. अंगण मोकळे आहे. ना गुंडाच्या दहशतीचे सावट ना अत्याचाराची भीती. आता इकडेही महिला-मुली मोकळेपणाने फिरू शकतात. छोटी मुलं रस्त्यावर खेळू शकतात.
सायकल चालवू शकतात अन् पतंगही उडवू शकतात. तरुण बिनधास्त कुठेही उभे राहून गप्पा करू शकतात. १० वर्षांपूर्वी असे नव्हते. कुख्यात अक्कू आणि त्याचे गुंड साथीदार कुणालाही मारहाण करून त्याच्या खिशातील रक्कम हिसकावून घ्यायचे. रस्ताच काय, अंगणातून आणि अनेकदा घरात शिरून महिला मुलीला उचलून न्यायचे. तिच्यावर सामूहिक बलात्कार करायचे. विरोध केल्यास जीवघेणी मारहाण करायचे. वस्तीत विवस्त्र फिरवण्याची तर अक्कूला विकृतीच जडली होती. छोट्या मुलांना रस्त्यावर खेळण्याची, धावण्या-बागडण्याची मुभा नव्हती. सायकली हिसकावून मुलांना मारहाण केली जात होती. गप्पा करताना दिसलेल्या तरुणांना दारू आणायला, नेऊन द्यायला, प्यायला लावले जात होते. विरोध केल्यास भरवस्तीत बेदम मारहाण केली जात होती. एकूणच कस्तुरबानगरातील सर्वसामान्य नागरिकांचे कुख्यात अक्कूने जगणेच मुश्किल केले होते.
त्याच्या या पापात जरीपटका ठाण्यातील काही पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याने गोरगरिबांचा आक्रोश निर्दयपणे चिरडला जात होता. एक दोन, पाच दहा नव्हे, तर अक्कू आणि त्याच्या साथीदारांनी तब्बल ४० महिला मुलींवर अत्याचार केले होते. अनेकींना त्यांच्या पालकांसमोरच अपमानित केले होते. त्यामुळे अक्कूविरोधात कस्तुरबानगरात असंतोष धगधगत होता.
त्याचा अखेर भडका उडाला. १३ आॅगस्ट २००४ ला कुख्यात अक्कूला संतप्त जमावाने थेट न्यायमंदिराच्या कक्षातच ठेचले. त्याची हत्या झाल्यानंतर कस्तुरबानगरातील नागरिक बेभान झाले होते. प्रत्येकानेच या प्रकरणात स्वत:ला अटक करवून घेण्याची तयारी दाखवली होती. पोलिसांनी मात्र, २१ जणांना आरोपी केले होते. अक्कू हत्याकांडाचा निकालसोमवारी १० नोव्हेंबरला लागला. न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केले.
वेगळ्या आनंदाची अनुभूती
दहा वर्षांपूर्वी मनावर अक्कूच्या दहशतीचा दगड होता. तो मारला गेल्यानंतर दहशत कमी झाली. मात्र, मुलगी उषा आणि जावई विलास भांडे यात आरोपी म्हणून अडकल्यामुळे एक वेगळेच दडपण होते. तब्बल दहा वर्षे या दडपणात जगलो. सोमवारी निकाल लागल्यापासून मोकळा श्वास घेतो आहे. वेगळ्या आनंदाची अनुभूती आहे.
सारे कसे बिनधास्त
कस्तुरबानगरात निकालाचा दिवस एखाद्या सणोत्सवासारखा साजरा करण्यात आला. संपूर्ण वस्तीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी गोळा केली. डीजे लावला. मिठाई बोलवली. रात्री १.३० ते २.०० वाजेपर्यंत कस्तुरबानगरात जल्लोष सुरू होता. आज निकालानंतरचा दुसरा दिवस. या भागातील बहुतांश मंडळी आपल्या रोजीरोटीवर निघून गेली. मात्र, लहान मुले छान पतंग उडवत होती. सायकल चालवत होती. मुली, तरुणी मोकळेपणाने फिरत होत्या. तरुणांचे थवे गप्पा करीत होते. सारे कसे बिनधास्त होते.
आनंदाला पारावार नाही
याच वस्तीत लहानाची मोठी झाली. मात्र, दहा वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले की अंगावर काटाच उभा राहातो. अक्कू आणि त्याच्या साथीदारांची नजर कुणावरच पडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करीत होतो. अखेर त्याची हत्या झाली अन् आम्ही सारेच आनंदलो. सोमवारी निकाल लागल्यापासून तर आनंदाला पारावारच उरला नाही.