ढोंगी बुवांचे अंधानुकरण नको; विष्णू कोकजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 07:57 PM2018-04-25T19:57:05+5:302018-04-25T19:57:12+5:30
ढोंगी बुवांचे अंधानुकरण समाजाने टाळले पाहिजे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आसाराम बापूला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचे विश्व हिंदू परिषदेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. आसाराम बापूसारखे लोक लोकांच्या भावनांचा फायदा उचलतात. याचा धर्म व समाजावर परिणाम होतो. अशा प्रकारच्या ढोंगी बुवांचे अंधानुकरण समाजाने टाळले पाहिजे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विष्णू कोकजे प्रथमच नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आसाराम बापूसारखे लोक संन्यासी बनण्याचे ढोंग करतात. विकृतीतून ते कुकर्म करतात आणि लोक सगळ्याच धर्मगुरू व संन्याशांकडे त्याच नजरेने पाहू लागतात. निष्ठेने सेवाकार्य करणाऱ्यांचा विश्वास डळमळतो. मात्र सर्वच धर्मगुरू असे नसतात. काही लोकांमुळे हिंदू धर्म बदनाम होतो. आसाराम बापूला झालेली शिक्षा ही इतर ढोंगी बुवांसाठी एक इशारा आहे. या शिक्षेमुळे अशा लोकांवर वचक बसेल, असा विश्वास विष्णू कोकजे यांनी व्यक्त केला. यावेळी ‘सोशल मीडिया’वर हिंदू समाजावर चिखलफेक करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा त्यांनी आरोप केला. देशातील काही लोक हिंदू समाजाविरोधात षड्यंत्र रचताना दिसून येत आहेत. यातूनच भगवा दहशतवाद यासारख्या शब्दाचा जन्म झाला. मात्र हे षड्यंत्र फार वेळ टिकणार नाही. जनता आता समजूतदार झाली आहे. अशा दुष्प्रचाराला ते बळी पडणार नाहीत. हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी शेकणाऱ्यांचे चेहरे जनतेसमोर आले आहेत, असे म्हणत त्यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांचे थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले.
तोगडियांबाबत सावध पवित्रा
विहिंपचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्याबद्दल विष्णू कोकजे यांनी सावध भूमिका घेतली. तोगडिया नेमके काय करत आहेत, याच्याशी आमचा संबंध नाही. ते वंदनीय आहेत व त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही. आमच्या संस्कारांमध्ये अशा बाबी बसतदेखील नाही, असे विष्णू कोकजे यांनी स्पष्ट केले.
राममंदिराचा निर्णय हिंदूंच्याच बाजूने येणार
यावेळी विष्णू कोकजे यांनी राममंदिर लवकरच निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. अयोध्येच्या वादग्रस्त जागेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. आम्हाला न्यायालयाच्या निष्पक्षतेवर पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयातून हिंदूंच्याच बाजूने निर्णय येईल, असे ते म्हणाले.
संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा
विष्णू कोकजे यांनी सर्वात अगोदर संघ स्मृतिमंदिराला भेट दिली. त्यानंतर संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास धंतोली येथील अहल्या मंदिरात संघ परिवाराशी जुळलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत विहिंपचे कार्याध्यक्ष अलोक कुमार, महामंत्री मिलिंद परांडे, संघटन महामंत्री विनायक देशपांडे, उपाध्यक्ष चंपत राय हे प्रामुख्याने उपस्थित होते.