कोणत्याही पराभवानं खचून जाऊ नका; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:25 PM2022-12-23T13:25:22+5:302022-12-23T15:05:19+5:30
वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना नवनियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले
नागपूर : एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज तो भाजपचा बालेकिल्ला झालाय. प्रत्येक राजकीय पक्ष यातून गेला आहे. काही काळानंतर सत्तांतर होत असतात, पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. मनसेच्याही वाट्याला यश आलं, अपयश आलं. पण आपण खचलो नाही आणि खचणारही नाही. असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. कोणत्याही पराभवानं खचून जाऊ नका, फक्त जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहा, यश नक्कीच आपलं आहे असा सल्ला त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकदिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. आज वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात विदर्भातील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गेल्यावेळी आपण विदर्भाच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर मनसेला पदाधिकाऱ्यासाठी माणसं मिळत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्यांनी त्या बातम्या टाकल्या होत्या त्यांनी डोळ्यात अंजन घालावं. यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्रवाटप करण्यात आले असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
जे लोकं आपल्यावर हसताहेत त्यांना हसू द्या. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून हे पोट्टं काय करणार असंही काही लोक बोलत असतील तर बोलू द्यावं. पण मी विश्वास देतो की एकदिवशी हेच पोट्टं त्यांच्यावर वरवंटा फिरवणार असा इशारा त्यांनी मनसेची खिल्ली उडविणाऱ्यांना दिला. तर, तुम्हाला निवडून हे पद देण्यात आलं आहे. त्या पदाची जबाबदारी ओळखा. तुम्ही कोणत्याही पदावर असला तरी दुसऱ्या पदाधिकाऱ्याला कधी तुच्छ मानू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.
राज ठाकरे विधिमंडळात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
दरम्यान, मनसेचा पक्षीय कार्यक्रम आटोपून राज ठाकरे नागपूरच्या विधान भवनात पोहचले. राज ठाकरे विधानभवनात पोहचल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जात राज ठाकरेंनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे.