माझ्या शहराला बदनाम करू नका !
By admin | Published: December 24, 2015 03:21 AM2015-12-24T03:21:02+5:302015-12-24T03:21:02+5:30
नागपूर हे क्राईम कॅपिटल झाल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणूक रोखण्याचा हा डाव आहे, ....
नागपूर : नागपूर हे क्राईम कॅपिटल झाल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणूक रोखण्याचा हा डाव आहे, असा थेट आरोप करीत माझ्यावर हवी तेवढी टीका करा पण माझ्या शहराला बदनाम करू नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना घातली.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील काही सदस्यांनी नागपूर हे क्राईम कॅपिटल झाल्याची टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच गुन्हेगारी वाढली असून चेन लिफ्टिंगच्या वाढत्या घटनांमुळे महिलांना दुपारीही घराबाहेर पडणे कठीण झाल्याचे सांगत गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले होते. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी तेवढ्याच दमाने उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, नागपुरात गुंतवणूक वाढत आहे.त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. मी नागपूरचा असल्यामुळे या शहराला लक्ष्य केले जात आहे. काहीतरी संयम असला पाहिजे. आकडेवारी तपासा, नागपूर शहरातील गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. ३४ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. ८० जणांवर मोका लावण्यात आला आहे. चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अशा घटनांमध्ये नागपूर राज्यात पहिल्या तीन शहरांमध्येही नसल्याचे सांगत नागपूर कधीही क्राईम कॅपिटल नव्हते, नाही आणि यापुढील काळातही तसे होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. किंबहुना राज्यातील एकही शहर क्राईम कॅपिटल होऊ दिले जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.