‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांना नाउमेद करू नका, अन्यथा.. दिला 'हा' इशारा
By गणेश हुड | Published: July 20, 2023 01:24 PM2023-07-20T13:24:22+5:302023-07-20T13:25:51+5:30
वेळोवेळी आश्वासने देवूनही मागण्यांकडे दुर्लक्षच
नागपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध मागण्या मागील काही वर्षापासून प्रलंबित आहेत. शासनाने वेळोवेळी आश्वासने देवूनही अद्याप मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. ‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांना नाउमेद करू नका, न्याय न मिळाल्यास २५ जुलैला मुंबई येथे मोर्चा काढण्याचा इशारा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने दिला आहे.
२७ मार्च २०२३ रोची संघटनेच्या शिष्टंमळाला मुख्यमंत्र्यांनी उमेद महिला व कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १७ मे २०२३ रोजी ग्रामविकास मंत्र्यांनी महिना भरात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु मागण्या मान्य न झाल्याने २१ जून रोजी पुन्हा संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले असता आठवडाभरात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. वेळोवेळी आश्वासने दिल्यानंतरही मागण्या मान्य होत नसल्याने २५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा, संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अमोल बाविस्कर यांनी दिला आहे. मार्चात राज्यातून लाखो कर्मचारी सहभागी होणार असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले.
अशा आहेत मागण्या
-उमेद अभियानात कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना राहेयो प्रमाणे ३० दिवसाचे मासिक मानधन देण्यात यावे.
-मानधन महिन्याच्या १० तारखेपर्यंत वितरित करण्यात यावे.बंदी उठवून १०० टक्के गावात केडर निवड करण्यात यावी.
-अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करावी. ग्रामविकास विभागाने कडर निर्माण करून शासकीय सेवेत घ्यावे.
-एमएसआरएलएम च्या मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शक सूचनानुसार रिक्त , नवीन जागांवर पदभरती घ्यावी.
-प्रभाग समन्वयक, सहाय्य कर्मचाऱ्यांनी विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत व जिल्हाबाह्य बदली करण्यात यावी.
-कोविड काळातील वेतनवाढ देण्यात यावी.