वीज जोडणी कापू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:22+5:302021-02-12T04:08:22+5:30
नागपूर : ‘कोरोना’मुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत आलेली देयके न भरलेल्यांची वीज जोडणी तोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र ...
नागपूर : ‘कोरोना’मुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत आलेली देयके न भरलेल्यांची वीज जोडणी तोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र जनता अगोदरच ‘कोरोना’मुळे हवालदिल झाली आहे. त्यामुळे कुणाचीही वीज जोडणी कापण्यात येऊ नये, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज पुरवठा विभागाचे विभागीय संचालक रंगारी यांना ‘आप’तर्फे निवेदन देण्यात आले.
जास्त देयके रद्द करून कोरोना काळातील चार महिन्यांचे २०० युनिट वीज बिल माफ करावे आणि जनतेला दिलेले वचन पाळावे, याबाबत अनेकदा आंदोलने झाली; मात्र सरकारकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. वेळोवेळी मंत्रिमंडळात चर्चाही झाली, तसेच याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती मंत्री महोदयांनी मीडियाला दिली; परंतु आजपर्यंत सरकारकडून याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील जनता निर्णयाची वाट पाहत आहे; मात्र काही दिवसांपासून वीज ग्राहकांची जोडणी कापण्याचा इशारा देण्यात येत आहेत. याबाबत शासनाकडून आपल्या विभागाला काही आदेश प्राप्त झाला आहे का, असा प्रश्न ‘आप’तर्फे उपस्थित करण्यात आला. यावेळी देवेंद्र वानखेडे, अशोक मिश्रा, कविता सिंगल, आकाश सफेलकर, शंकर इंगोले, लक्ष्मीकांत दांडेकर, अलका पोपटकर, हरीश गुरुबक्षणि, सुरेंद्र समुद्र प्रामुख्याने उपस्थित होते.