शेवटच्या सहा महिन्यात ढेपाळू नका

By admin | Published: July 17, 2016 01:32 AM2016-07-17T01:32:16+5:302016-07-17T01:32:16+5:30

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागली आहे. शनिवारी पक्षातर्फे वर्धा रोडवरील राणी कोठी येथे आयोजित अभ्यास वर्गात

Do not dump in the last six months | शेवटच्या सहा महिन्यात ढेपाळू नका

शेवटच्या सहा महिन्यात ढेपाळू नका

Next

भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट सुरू : अभ्यासवर्गात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना टीप्स
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागली आहे. शनिवारी पक्षातर्फे वर्धा रोडवरील राणी कोठी येथे आयोजित अभ्यास वर्गात नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना इलेक्शन मॅनेजमेंटच्या टीप्स देण्यात आल्या. साडेचार वर्षे आपण आपल्या प्रभागात जोमाने विकास कामे केली. नागरिकांचे प्रश्न सोडविले. मात्र, आता शेवटच्या सहा महिन्यात ढेपाळू नका. आता जनतेची व्यक्तिगत कामे करण्यावर भर द्या. ज्या कामापासून जास्त लोक समाधानी होऊ शकत असतील, अशी कामे प्राधान्याने करा, असे उपदेशाचे डोज नगरसेवकांना पाजण्यात आले.
भाजपतर्फे आयोजित पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे उद्घाटन भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. यावेळी शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रा. अनिल सोले, महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, महामंत्री संदीप जोशी, महाअभियानचे विदर्भ संयोजक देवेंद्र दस्तुरे, नागपूर संयोजक प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह संघ परिवारातील तज्ज्ञ वक्त्यांनीही भाजप पदाधिकाऱ्यांना बौद्धिक दिले. आता निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे बूथ लेव्हलवरील कार्यकर्त्यांना सोबत घ्या. भाजपच्या लोकांना विश्वासात घ्या. प्रभागात भाजप विचारधारेचे जे जुने जानत लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घ्या, असे सल्ले देत प्रभागात जनतेशी कसे वागावे, त्यांचे प्रश्न कसे सोडवावे आदी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. विरोधक विचारतात कुठे आलेत अच्छे दिन ? त्यांना अभ्यासपूर्ण उत्तर द्या. दररोज एक योजना लोकांना सांगता येईल एवढ्या योजना केंद्र व राज्य सरकारने आणल्या आहेत. या योजनांची माहिती करून घ्या. त्या लोकांनाही पटवून सांगा. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर त्याचा प्रचार-प्रसार करा, अशा टीप्स देण्यात आल्या.
अभ्यासवर्गात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य प्रा. राजीव हडप, आ. डॉ. मिलिंद माने यांनी निवडणूक पूर्वतयारी यावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ सहकार्यवाह अतुल मोघे यांनी संघ परिवाराच्या कामांवर प्रकाश टाकला. भाजपला संघाने नव्हे तर त्याच्या स्वयंसेवकांनी जन्म दिल्याचे सांगत अशा ३७ संस्था कार्यरत असल्याचे सांगितले.
मात्र या संस्था संघाच्या अधिपत्याखाली नव्हे तर स्वतंत्रपणे काम करीत आहेत. स्वयंसेवक त्यांचे संचालन करतात. आशुतोष पाठक यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेल्या अंत्योदयाच्या मार्गावर आधारीत एकात्म मानववाद या विषयावर मार्गदर्शन केले.
रा.स्व.संघाचे प्रचारक सुमंत टेकाडे यांनी शिवाजी महाराज यांच्या कुशल कार्यप्रणालीवर प्रकाश टाकत निवडणुकीच्या दृष्टीने नेतृत्वक्षमता, नियोजन, टीम वर्क, व लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. पिंपरी चिंचवड येथील भाजपचे महामंत्री सारंग कामटेकर यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

सभापतींनी मांडला कामाचा लेखाजोखा
स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत यांच्यासह विविध समित्यांचे सभापती बंडू राऊत, सुनील अग्रवाल, बाल्या बोरकर, देवेंद्र मेहेर, दिव्या धुरडे, आदींनी या कार्यकाळात समितीमार्फत केलेल्या कामांचे प्रेझेंटेशन सादर करीत लेखाजोखा माडला. महापालिकेने मोठ्या प्रमाणात नागरी प्रश्न सोडविले, असा दावा करीत या सर्व बाबी जनतेसमोर मांडण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोबाईल ‘स्वीच आॅफ’
अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे सर्वांचेच मोबाईल ‘स्वीच आॅफ’ होते. रात्री उशिरा पहिल्या दिवसाचे सत्र संपल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांचे मोबाईल सुरू झाले. मात्र, शिबिरातील बाबी बाहेर कळता कामा नये, अशा सूचना असल्यामुळे पदाधिकारी शिबिरातील माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यास टाळत होते.

 

Web Title: Do not dump in the last six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.