प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका; संघाला आता कुठलेही आंदोलन करायचे नाही- डॉ. मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 06:47 AM2022-06-03T06:47:20+5:302022-06-03T06:47:27+5:30
नागपूर : सद्य:स्थितीत देशात ज्ञानवापीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. ही घटना इतिहासात घडली होती. आता हिंदू व मुस्लीम पक्षांनी ...
नागपूर : सद्य:स्थितीत देशात ज्ञानवापीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. ही घटना इतिहासात घडली होती. आता हिंदू व मुस्लीम पक्षांनी अतिवादीपणा टाळला पाहिजे. मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, तर हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दोन्ही समाजांचे कान टोचले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या गुरुवारी समारोपप्रसंगी सरसंघचालक म्हणाले, देशावर आक्रमण केल्यानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी अनेक मंदिरे तोडली. मुळात हिंदू समाजाच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा तो प्रयत्न होता. हिंदूंना वाटते की, आता अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा; परंतु आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत.
सरसंघचालक म्हणाले...
ज्ञानवापीच्या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढा. जर न्यायालयात कुणी गेले तर न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचा आदर झाला पाहिजे. राम मंदिर आंदोलनात संघ सहभागी झाला होता; परंतु ९ नोव्हेंबर रोजी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही. संघाचा कुणाच्याही पूजापद्धतीचा विरोध नाही; परंतु कुणीही दुसऱ्यांच्या धर्मपद्धतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करायला नको. देशाला विश्वगुरू बनविण्याचा मार्ग एकता व समन्वयातून जातो. जे लोक फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाही, त्यांनी येथील परंपरेशी व संस्कृतीशी समरस व्हायला हवे. एकमेकांना धमक्या देणे दोन्ही धर्मांच्या लोकांनी टाळले पाहिजे.