अपयशाने खचून न जाता जिद्दीने कामाला लागा
By admin | Published: June 1, 2017 02:31 AM2017-06-01T02:31:14+5:302017-06-01T02:31:14+5:30
माझी आई कोराडी मंदिर परिसरात चहा विकायची. मी शाळेतून आल्यावर तिला मदत करायचो.
माझी आई कोराडी मंदिर परिसरात चहा विकायची. मी शाळेतून आल्यावर तिला मदत करायचो. त्याच मंदिरात रात्री अभ्यास करायचो. खूप शिकावे, नोकरी करावी, अशी इच्छा होती. १२ वी ला सायन्समध्ये प्रवेश घेतला. ६८ टक्के मिळाले. मला केमिकल इंजिनिअर व्हायचे होते. एलआयटीला प्रवेश मिळत होता. पण फी भरण्यासाठी पैसे नव्हते. आपण मुलाला इंजिनिअर बनवू शकत नाही याचे दु:ख आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शेवटी पैशाअभावी प्रवेश घेऊ शकलो नाही. बीएस्सीला प्रवेश घेतला. पण मी नैराश्याच्या गर्तेत बुडालो होतो. तणावात मी बीएस्सी सेकंड इयर सोडले. गावात किराणा दुकान सुरू केले. दूध विकू लागलो. तेथे मन रमत नव्हते. शेवटी आॅटो चालवला. आपण आता इंजिनिअर होऊ शकत नाही ही एक खंत मनाला टोचत होती. पण मला मोठा व्यक्ती बनायचे होते. त्यामुळे आॅटो चालवत असताना मी छोटे मोठे कंत्राट घेऊ लागलो. मला गवत काढण्याचे पहिले काम मिळाले दोन हजार रुपयांचे. पुढे मी व्यवसाय करू लागलो. सोबतीला सामाजिक काम होते. याच सामाजिक आंदोलनातून राजकारणात आलो. गरिबीमुळे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही याची खंत आहे. पण नैराश्यावर मात करून मी माझ्या आयुष्याची नवी वाट निर्माण केली. माझे विद्यार्थी मित्रांना एवढेच आवाहन आहे की, १० वी १२ वी च्या यशावर आयुष्याची दिशा ठरत नसते. येथे यश मिळायला हवे. पण मिळाले नाही म्हणून आयुष्य उद्ध्वस्त झाले असे समजण्याचे कारण नाही. कुठल्याही क्षेत्रात परिश्रम घेण्याची तयारी असेल तर आपण यश मिळवू शकतो. त्यामुळे निराश होऊन, आत्महत्या करून आयुष्य संपविण्यात अर्थ नाही. या अपयशाने खचून न जाता जिद्दीने कामाला लागा. एवढीच माझी विनंती आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे,
ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री, नागपूर