फी भरली नाही म्हणून टीसी देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:10 AM2021-06-16T04:10:02+5:302021-06-16T04:10:02+5:30
नागपूर : शहरातील एका नामांकित शाळेने पालकांनी शैक्षणिक शुल्क दिले नाही, म्हणून विद्यार्थ्यांना टीसी दिला. काही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण ...
नागपूर : शहरातील एका नामांकित शाळेने पालकांनी शैक्षणिक शुल्क दिले नाही, म्हणून विद्यार्थ्यांना टीसी दिला. काही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले. त्यामुळे पालकांमध्ये शाळेच्या विरोधात चांगलाच संताप वाढला होता. शाळेवर कारवाई व्हावी यासाठी पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातही ठिय्या दिला होता. गेल्या आठवड्यात शिक्षणाधिकाऱ्यांनाही घेराव केला होता. परंतु शिक्षण विभागाकडून कुठलीही ठोस भूमिका घेण्यात येत नसल्याने, मंगळवारी पुन्हा पालक जिल्हा परिषदेपुढे एकत्र आले. मोठ्या संख्येने पालक आल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. काही निवडक पालकांच्या शिष्टमंडळासोबत पोलिसांच्या मध्यस्थीने चर्चा झाली. या चर्चेअंती शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन स्पष्ट केले की ज्या विद्यार्थ्यांना टीसी देण्यात आला आहे, त्यांचा टीसी परत घेऊन, शाळेत पुनर्प्रवेश द्यावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नये. शिक्षण हक्क कायद्यान्वये कुणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. यावेळी अभिषेक जैन, अमित होशिंग, मो. शाहीद शरीफ, भवानी प्रसाद चौबे, स्वरेशा दमके, राजकुमार टाले, गिरीश पांडे, अजय चालखुरे, लक्ष्मीकांत सावजी, अर्चना गिरी, मंजुषा चौगुले, मोनू चोपडे, विशाल जैन, गुलाम मुस्तफा आदी उपस्थित होते.