अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका : विजय कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:08 PM2018-02-23T22:08:39+5:302018-02-23T22:08:56+5:30
युवक बँकेकडे ऋण घेण्यासाठी अर्ज करताना अनुदान किती मिळेल, कुठल्या गोष्टींसाठी ऋण मिळेल, तसेच कर्ज थकलं तर ते कसे वसूल कराल, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा कर्ज थकवेल, अशी एक मानसिकताच बँक व्यवस्थापकांच्या मनात तयार होते. तेव्हा अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका, आपले ध्येय निश्चित करा, काय करायचे आहे, त्याचा अभ्यास करा, असे मत महाराष्ट्र बँकेचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवक बँकेकडे ऋण घेण्यासाठी अर्ज करताना अनुदान किती मिळेल, कुठल्या गोष्टींसाठी ऋण मिळेल, तसेच कर्ज थकलं तर ते कसे वसूल कराल, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा कर्ज थकवेल, अशी एक मानसिकताच बँक व्यवस्थापकांच्या मनात तयार होते. तेव्हा अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका, आपले ध्येय निश्चित करा, काय करायचे आहे, त्याचा अभ्यास करा, असे मत महाराष्ट्र बँकेचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी व्यक्त केले. तसेच बँकांमध्ये वाईट अनुभव आले तरी थांबू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
फॉर्च्युन फाऊंडेशनद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगरपालिका, इंजिनियरिंग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या युथ एम्पॉवरमेंटमध्ये शुक्रवारी मार्गदर्शनपर सत्रामध्ये मुद्र्रा बँकिंग संदर्भातील माहिती देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. प्रा. अनिल सोले, ईसीपीएचे सचिव कुणाल पडोळे, नवनीतसिंह तुली, आशिष वांदिले उपस्थित होते.
ऋण मागताना काय अभ्यास करावा याची माहिती देताना विजय कांबळे पुढे म्हणाले की, अनुदान मिळते म्हणून व्यवसाय करू नका, व्यवसायासंबंधीची माहिती कादगावर उतरवून त्याचे सर्वसाधारण अंदाजपत्र तयार करावे. हे सांगताना त्यांनी सीएची आवश्यकता नसल्याचेही विशेषत्वाने सांगितले.
आपल्यातील आत्मविश्वास बँकेच्या व्यवस्थापकांची मानसिकता बदलवून त्यांना ऋण देण्यास भाग पाडेल, असा विश्वासही व्यक्त केला. कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळविण्याच्या दृष्टीने बँक आॅफ महाराष्ट्र आणि आपल्या कॅबिनचे दरवाजे नेहमी खुले असल्याचेही त्यांनी यावेळी विशेषत्वाने नमूद केले.
फ्लाय अॅशच्या व्यवसायातून रोजगाराच्या संधी - सुधीर पालीवाल
वीज प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात फ्लाय अॅश (राखड) निर्माण होते. ती मानवाच्या स्वास्थ्यासाठी हानीकारक असते. मात्र, त्याद्वारे बांधकामाच्या संबंधित वस्तूंची निर्मिती होऊ शकते. त्याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन प्रदूषणालाही आळा बसेल, असे मत महाराष्ट्र स्टेट फ्लाय अॅश कौन्सिलचे तज्ज्ञ सदस्य सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केले. फ्लाय अॅशच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबद्दल त्यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले.