आरोग्य सेवा देताना हयगय नको

By admin | Published: July 24, 2016 02:05 AM2016-07-24T02:05:57+5:302016-07-24T02:05:57+5:30

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.

Do not hesitate to provide health care | आरोग्य सेवा देताना हयगय नको

आरोग्य सेवा देताना हयगय नको

Next

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : सावरगाव येथील घटनेची गंभीर दखल
नागपूर : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. रुग्णांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अनास्था आढळून आल्यास संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एका बैठकीत दिले.
रविभवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, नागपूर मनपाचे अप्पर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, डॉ. पिनाक दंदे, डॉ. अनुप मरार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे नागपूर शाखा अध्यक्ष डॉ. अविनाश वासे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई व इतर अशासकीय सदस्य उपस्थित होते.सावरगाव येथे गॅस्ट्रोने मृत्यू पावलेल्या रुग्णांबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी स्वच्छतेच्या बाबतीत ज्यांनी निष्काळजीपणा केला, त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी. येत्या आठ दिवसात संपूर्ण जिल्हा व नागपूर जिल्ह्यात फॉगिंग करावे. जेणेकरून डासांचे प्रमाण कमी होईल. स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यात यावी. मनपा, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन यांनी साथ रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांचा तपशील दररोज रात्री ८ वाजता ई-मेलवर पालकमंत्री कार्यालयात द्यावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
रिकामे भूखंड, नाल्या यात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा निपटारा करणे गरजेचे आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. ग्रामसेवक, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी यांनी गावात स्वच्छतेच्या बाबतीत गावकऱ्यांना प्रबोधन करावे. विशेषत: विद्यार्थ्यांना या कामात गुंतवावे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सावरगावच्या गॅस्ट्रोचा आढावा सावरगाव येथे गेल्या आठवड्यात गॅस्ट्रो आजाराचा उद्रेक झाल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी २८० आंतररुग्ण होते. यानंतर तातडीने ग्रामपंचायतमार्फत सार्वजनिक व खासगी विहिरींच्या ८१ जलस्रोतांचे क्लोरीनेशन करण्यात आले. गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात येऊन ग्रामसफाई अभियान राबविण्यात आले. सध्या चिखली येथील तीन विहिरीतून सावरगावला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आतापावेतो ६४ जलस्रोतातून पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील १६ पाणीनमुने अयोग्य आढळले. ‘स्वाईन फ्लू’ या आजाराचा एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आढळला, असून त्याचा मृत्यू झालेला आहे. सध्या जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. योगेंद्र सवई यांनी दिली.(प्रतिनिधी)

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १८ जागा रिक्त
मांढळ येथे नियमित आरोग्य अधिकारी देण्यात यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात १८ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत, असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले. या समितीची पुढील बैठक येत्या सात दिवसात घेण्यात यावी. बैठकीत आरोग्यविषयक सर्व अहवाल सादर करावा. आरोग्य सेवेत कोणतीही हयगय होता कामा नये, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

 

Web Title: Do not hesitate to provide health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.