कचरागाडीत टाकायला संकोच कसला, गडरलाइन होताहेत चोकअप
By मंगेश व्यवहारे | Updated: October 30, 2023 13:53 IST2023-10-30T13:53:05+5:302023-10-30T13:53:46+5:30
सॅनिटरी नॅपकीन, डायपर फेकल्यामुळे ड्रेनेज तुंबले : पर्यावरण व आरोग्यास धोका

कचरागाडीत टाकायला संकोच कसला, गडरलाइन होताहेत चोकअप
नागपूर : सॅनिटरी पॅड व लहान मुलांसाठी वापरण्यात येत असलेले डायपर घरोघरी येणाऱ्या कचऱ्याच्या गाडीत टाकण्यास महिला संकोच करतात. काही महिला त्या जाळून टाकतात तर काही उघड्यावर फेकून देतात, तर काही महिला शौचालयाच्या माध्यमातून विल्हेवाट लावत असल्याने शहरातील गडरलाइन, ड्रेनेज वारंवार चोकअप होताहेत. महापालिकेचे सफाई कर्मचारी जेव्हा चोकअप काढतात, तेव्हा हे प्रकार निदर्शनास येतात.
शहरात सॅनिटरी नॅपकिन व लहान मुलांच्या डायपरची दरमहा ५ लाखांहून अधिक पाकिटांची विक्री होते; परंतु कचरा संकलित करणाऱ्या गाड्यांमध्ये निघणारा हा कचरा अवघा १० टन आहे. आरोग्यासाठी घातक, जलसाठे दूषित करणारी बाब म्हणजे वापरलेली सॅनिटरी नॅपकिन, डायपर होय. त्यामुळे या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन व विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मते हा कचरा खुल्या जागेत, कचराकुंड्यात व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
- जमा होतो केवळ १० टन कचरा
शहरात दरमहा ५ लाखांहून अधिक नॅपकिनच्या पाकिटाची विक्री होते, तर डायपरची विक्री ३ लाख पाकिटाची होते. एका पाकिटात किमान सहा नग असतात. महापालिका शहरातून कचरा संकलित करते. त्यात हा कचरा १० टनाच्या जवळपास निघतो. त्यातही ६ टन सॅनिटरी नॅपकिन व ४ टन डायपरचा समावेश आहे.
- कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार नॅपकिनच्या प्रत्येक पाकिटासोबत विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र पाकीट ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. कंपन्यांकडून हे नियम पाळले जात नाहीत.