दहावीनंतर मुलांच्या कामात लुडबूड करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:25 AM2018-02-14T00:25:19+5:302018-02-14T00:27:37+5:30
आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान होतो. यामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात पालकांनी लुडबूड करू नये, मात्र त्याच्यावर ‘वॉच’ ठेवावा, असेही ते म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागूपर : आत्महत्या करणे हे एक मोठे गूढ रहस्य आहे. ८५ टक्के आत्महत्या कुठल्या न कुठल्या मानसिक आजारातून होतात, तर १५ टक्के आत्महत्या या नाचक्की, आर्थिक, शैक्षणिक, भीती, लाज आदी कारणाने होतात. मात्र आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान होतो. यामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात पालकांनी लुडबूड करू नये, मात्र त्याच्यावर ‘वॉच’ ठेवावा, असेही ते म्हणाले.
ऋत्विक बोके या बारावीचा विद्यार्थ्याची आत्महत्या ही त्याच्या कुटुंबीयांनाच नाही तर शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातील कुटुंबीयांना धक्का देऊन गेली. या घटनेला घेऊन डॉ. अविनाश जोशी ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, आत्महत्येचा विचार येणे म्हणजे, इतरांचा रागावर स्वत:वर काढून स्वत:ला संपवून त्या व्यक्तीला धडा शिकविणे असल्यासारखे असते. ऋत्विक बोकेच्या प्रकरणात सध्याच काही बोलता येणार नाही. परंतु त्याची आत्महत्या ही १५ टक्क्यांमधील कारणामधील एक असावी. काही विद्यार्थी आपल्या मनातील समस्या दुसऱ्यांना सांगत नाही किंवा सांगू शकत नाही. अशा कुढत वावरणाºया विद्यार्थ्यांशी शिक्षक, पालकांनी लगेच हेरून त्याच्याशी संवाद वाढविणे फार महत्त्वाचे ठरते.
- पालकांनो याकडे लक्ष द्या
- आपल्या इच्छा मुलांवर लादू नका
- दहावीनंतर त्यांच्या दैनंदिन कामात लुडबूड करू नका, मात्र ‘वॉच’ ठेवा.
- मुलाशी सकारात्मक संवाद साधा
- त्याच्या करिअरविषयी आस्थेने चौकशी करा
- त्याच्या इच्छांना मान द्या
- मुलांना अति‘पॉकेटमनी’ देणे टाळा.
- मुलाचा विश्वास संपादन करा
- दहावीनंतर त्याच्याशी मैत्रीपूर्व व्यवहार ठेवा.
- लहानपणापासूनच मुलांना नाही म्हणायला शिका