युतीच्या नावाने जनतेला वेठीस धरू नका :शिवसेना सदस्यांचे जि.प.अध्यक्षांना प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:56 PM2019-03-19T23:56:34+5:302019-03-19T23:57:27+5:30
रामटेक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जसा रंगात येत आहे, तसतसा जि.प.च्या भाजप-सेनेच्या लोकप्रतिनिधीचा कलगीतुरा आणखी रंगताना दिसतो आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या गोडबोलेवर काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर गोडबोले यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, युतीच्या नावावर जनतेस वेठीस धरू नका. कमिशनखोरीचे पुरावे हवे असतील तर नार्को टेस्ट करा. त्यांनी अध्यक्षाच्या पतीला ‘चौकीदार’ म्हणून टोला लगावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जसा रंगात येत आहे, तसतसा जि.प.च्या भाजप-सेनेच्या लोकप्रतिनिधीचा कलगीतुरा आणखी रंगताना दिसतो आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या गोडबोलेवर काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर गोडबोले यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, युतीच्या नावावर जनतेस वेठीस धरू नका. कमिशनखोरीचे पुरावे हवे असतील तर नार्को टेस्ट करा. त्यांनी अध्यक्षाच्या पतीला ‘चौकीदार’ म्हणून टोला लगावला आहे.
गोडबोले म्हणाल्या की, गेल्या वर्षी १०७० बोअरवेल मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी ८१८ बोअरवेल झाल्या, २५२ बोअरवेल होऊ शकल्या नाही. कारण जि.प. अध्यक्ष व त्यांच्या पतीवर कमिशनखोरी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तीन वर्षांपूर्वी झालेल्या बोअरवेलच्या कामासंबंधी अध्यक्षांनी तक्रार केली व कंत्राटदाराचे २८ टक्के बिल थांबवून ठेवले. आजपर्यंत त्या प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय झाला नाही. दोन कोटीचे बिल गेल्या तीन वर्षापासून थकीत असेल तर कोण कंत्राटदार निविदा भरेल, असा सावलही त्यांनी केला. बोअरवेल कंत्राटदारांनी वारंवार इशारा दिल्यानंतरही अध्यक्षांनी काहीच उपाययोजना केल्या नाही. पाणीटंचाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर जि.प.ला सहाव्यांदा निविदा कॉल कराव्या लागत असतील तर अध्यक्षांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसची सुपारी कुणी घेतली?
गोडबोले या काँग्रेसची सुपारी घेतल्यासारख्या वागतात, असा आरोप अध्यक्षांनी केला, त्यावर उत्तर देताना गोडबोले म्हणाल्या की भाजप-शिवसेनेचे अनेक सदस्य जि.प. अध्यक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. काँग्रेस सदस्यांच्या मर्जीनुसार महिला मेळावे रद्द केले जातात. काँग्रेस सदस्यांच्या मतावर जि.प. चालत असती तर काँग्रेसची सुपारी कुणी घेतली आहे. हे कोराडीच्या आई जगदंबेच्या साक्षीने अध्यक्षांनीच सांगावे, असा सवाल गोडबोले यांनी उपस्थित केला.
युती धर्म पाळण्याचा सल्ला देऊ नये
युती धर्म पाळण्याचा सल्ला अध्यक्षांनी आम्हाला देऊ नये, आम्ही युतीचे शिलेदार आहोतच. युतीचा धर्म आम्ही पाळतच आहोत. ते तुमच्याकडून शिकायची गरज नाही. शिवसेना-भाजप युती म्हणजे नागपूर जि.प.मधील पाप लपविण्यासाठी झालेली नाही. युतीच्या नावाने नागपूर जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरू नये. जिल्ह्यातील जनतेची मूलभूत गरज असलेला पाणीप्रश्न अध्यक्ष सोडवू शकत नसतील तर त्यांनी आपली खुर्ची रिकामी करावी, अशी मागणी पुन्हा जि.प. सदस्या भारतीताई देवेंद्र गोडबोले यांनी केली.