उपचारासाठी गरीब रुग्णांना प्रतिक्षेत ठेवू नका; नितीन गडकरींनी दिल्या ‘एम्स’च्या अधिकाऱ्यांना सूचना
By सुमेध वाघमार | Published: August 3, 2024 06:02 PM2024-08-03T18:02:55+5:302024-08-03T18:05:53+5:30
Nagpur : गडकरी यांनी ‘एम्स’मधील कामाचा व यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा घेतला आढावा
सुमेध वाघमारे
नागपूर : विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून नागपूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारण्यात आली आहे. त्यामुळे कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी प्रतिक्षेत राहणार नाही, याची काळजी घ्या, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी ‘एम्स’च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सचूना दिल्या.
गडकरी यांनी ‘एम्स’मधील कामाचा व यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यावेळी ‘एम्स’चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संचालक डॉ. प्रशांत जोशी व इतर वरीष्ठ डॉक्टर उपस्थित होते. ‘एम्स’मध्ये गरीब रुग्णांवरील उपचाराला घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.
उपचारांसाठी, शस्त्रक्रियांसाठी प्रतिक्षा का?
‘एम्स’मध्ये उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी प्रतिक्षा का?, असा प्रश्न गडकरी यांनी विचारला. त्याचे कारण काय आहे, त्याचा शोध घ्या, असे म्हणण्याची वेळही त्यांच्यावर आली.
तर नागपुरातील ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा घ्या!
उपचारासाठी गरीब रुग्णांना वाट बघायची गरज पडत असल्यास नागपुरातील ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा घेता येईल का, हे तपासून बघा. ‘एम्स’मधील परिचारिकांची रिक्त पदे भरून कामाचा ताण कमी करा, असेही त्यांनी सूचविले.
गरिबांना लाभ होईल या दृष्टीने काम करा
मुबलक औषध साठा आहे की नाही, तपासण्या करणारी यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, याचीही पूर्ण काळजी घ्या. एम्समधील पूर्ण व्यवस्थेचा लाभ गरिबांना होईल यादृष्टीने काम करावे, असेही गडकरी म्हणाले. यावेळी गडकरी यांच्या हस्ते ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट युनिट’, ‘सिकल सेल युनिट’, ‘न्युक्लियर मेडिसिन’ आणि ‘आय बँक’ या विभागांचे उद्घाटन झाले.
सिकलसेलच्या रुग्णांवर उपचार झालेच पाहिजेत
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सिकलसेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. थॅलेसेमियाचेही रुग्ण आहेत. त्यामुळे एम्समध्ये त्यांच्यावर उपचार झालेच पाहिजे, असा आग्रह गडकरी यांनी व्यक्त केला. ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ची संख्या वाढविण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.