राष्ट्रपित्याचे पूर्ण नावही माहीत नाही!

By Admin | Published: October 2, 2015 07:16 AM2015-10-02T07:16:59+5:302015-10-02T07:16:59+5:30

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी नावाचे एक सोनेरी पान आहे. आपल्या लढ्याला

Do not know the full name of the President! | राष्ट्रपित्याचे पूर्ण नावही माहीत नाही!

राष्ट्रपित्याचे पूर्ण नावही माहीत नाही!

googlenewsNext

नागपूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी नावाचे एक सोनेरी पान आहे. आपल्या लढ्याला नैतिकतेची जोड देत या महात्म्याने स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. म्हणूनच अवघ्या जगाला त्यांची दखल घ्यावी लागली. जगभरातल्या तत्वज्ञानात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला. परंतु, उद्याचे भविष्य असलेल्या पिढीला अजूनही गांधीजी समजले नाहीत, उमजलेही नाहीत. ३० टक्के विद्यार्थ्यांना तर महात्मा गांधी यांचे पूर्ण नावही माहीत नाही. ‘लोकमत’ने गांधी जयंतीनिमित्त केलेल्या सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव पुढे आले.
२ आॅक्टोबर हा गांधीजींंचा जन्मदिन. संपूर्ण देशात हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांनी दिलेली शिकवण ही भारतालाच नव्हे तर जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे, त्यांचे विचार जगभरात आत्मसात केले जात आहेत. परंतु उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना गांधी मात्र कळले नाहीत. सर्वेक्षणात वर्ग ५ ते १० आणि ११ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींबद्दल सात प्रश्न विचारण्यात आले होते. यात महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय?, त्यांचा जन्म कधी झाला, त्यांची हत्या कधी झाली, हत्या कुणी केली. गाधींजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वात प्रथम कुणी संबोधले. गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव काय आणि गांधीजींचे प्रसिद्ध भजन कोणते? या प्रश्नांचा समावेश होता.
यात महात्मा गांधी यांचे मोहनदास करमचंद गांधी हे पूर्ण नाव तब्बल ७० टक्के विद्यार्थ्यांनी अतिशय अचूकपणे सांगितले, तर ३० टक्के विद्यार्थ्यांना गांधीजींचे पूर्ण नावही लिहिता आले नाही. २ आॅक्टोबर १८६९ ही महात्मा गांधी यांची जन्मतारीख ६४ टक्के विद्यार्थ्यांना अचूकपणे सांगता आली तर ३६ टक्के लोकांना ती माहीतच नव्हती. काही विद्यार्थ्यांनी केवळ वर्ष सांगितले.
विद्यार्थ्यांचा सर्वाधिक गोंधळ उडाला तो म्हणजे महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून कुणी संबोधित केले? या प्रश्नाचा. यामध्ये ११ टक्के विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस, १८ टक्के विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, ११ टक्के विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ५ टक्के विद्यार्थ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे नाव सांगितले. २५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, लोकांनी त्यांना राष्ट्रपिता केले, तर ३० टक्के विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहितीच नाही. गांधीजींची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाल्याचे उत्तर २३ टक्के विद्यार्थ्यांनी दिले, तर ७७ टक्के विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहीतच नाही. तर ‘रघुपती राघव राजाराम’ हे गांधीजींचे प्रसिद्ध भजन असल्याचे ५१ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. ५ टक्के विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन’ हे उत्तर दिले. २५ टक्के विद्यार्थ्यांनी रघुपती राघव आणि वैष्णव जन असे दोन्ही उत्तर सांगितले तर १९ टक्के विद्यार्थ्यांना यासंदर्भात उत्तरच माहीत नाही.

गांधीजींच्या हत्येबद्दल ६० टक्के विद्यार्थी संभ्रमात
महात्मा गांधी यांची हत्या नाथुराम गोडसे याने केली, असे ४० टक्के विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले. परंतु ६० टक्के विद्यार्थी मात्र संभ्रमावस्थेत दिसून आले. यापैकी २० टक्के विद्यार्थ्यांनी गांधीजींची हत्या ही एका वेड्या माणसाने केल्याचे सांगितले. तर गांधीजींची हत्या ही इंग्रजांनी केल्याचे १५ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. २५ टक्के विद्यार्थ्यांना माहितीच नाही. गांधीजींची हत्या विरोधी पक्षाच्या नेत्याने केल्याचेही काही विद्यार्थ्यांचे उत्तर होते.
आत्मचरित्र म्हणजे काय?
‘माझे सत्याचे प्रयोग’ हे गांधीजींचे गाजलेले आत्मचरित्र; परंतु यासंदर्भात ९७ टक्के विद्यार्थ्यांना माहीतच नाही. अनेक विद्यार्थ्यांनी तर आत्मचरित्र म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थित केला. काही विद्यार्थ्यांनी बापू, वैष्णव जन, गांधीबोध, स्वातंत्र्य भारत, गीताग्रहस्थ आणि गांधीसागर अशी उत्तरे दिली.

Web Title: Do not know the full name of the President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.