सुट्टीलाही विनापरवानगी मुख्यालय सोडू नका; अपवादात्मक स्थितीतच तीन दिवसांची रजा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 08:47 PM2022-10-17T20:47:30+5:302022-10-17T20:48:41+5:30
Nagpur News तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले. याची चर्चा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पसरली आहे.
नागपूर : तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले. याची चर्चा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पसरली आहे. यामुळेच की काय, मागील काही दिवसांत जिल्हा शल्यचिकित्सकांपासून ते आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी काही रुग्णालयांना आकस्मिक भेटी दिली असताना, सर्वच काही शिस्तीत असल्याचे दिसून आले.
अधिकारी कर्तव्यकठोर असेल तर खालचे कर्मचारी शिस्तीत राहतात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची सूत्रे तुकाराम मुंडे यांनी हाती घेताच कर्मचाऱ्यांना शिस्तीचा पाठ दिला आहे. प्रमुखांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक सुटीच्या दिवशीही आरोग्य कर्मचाऱ्यांना यापुढे मुख्यालय सोडता येणार नाही असे परिपत्रकच काढले. यामध्ये कार्यालयीन शिस्त व रजा कशा घ्याव्यात यांचा उल्लेख आहे. आरोग्य केंद्रे आणि उप व जिल्हा रुग्णालयांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तहसील आरोग्य अधिकाऱ्यांपासून ते उपसंचालकांपर्यंत सर्वच कामाला लागले आहेत.
सातत्याने विलंब कराल, तर विभागीय चौकशी
: तीनपेक्षा जास्त वेळा उशिराने कामावर येणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या नैमित्तिक, अनुज्ञेय रजा ‘लॅप्स’ (खर्ची) करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतरही उशिराने येण्याची सवय मोडली नाही तर, अशीच विभागीय चौकशी केली जाऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.
: रुग्णालये, आरोग्य केंद्रामध्ये नियुक्त डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. शिस्तपालन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे.
अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी
मुंडे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. वनीता जैन व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांनी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालय व काही प्राथमिक आरोग्य केंद्राची अचानक तपासणी केली. या भेटीत सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी हजर होते. अशा अनपेक्षित भेटींचा कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे.
-याला म्हणतात शिस्त
नैमित्तिक व इतर रजा मंजूर करून घेणे आवश्यक
रजेचे अर्ज टपाल देऊन मुख्यालय सोडणे किंवा रजा घेणे योग्य नाही
: कार्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम, राष्ट्रीय सणामध्ये कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा गैरवर्तन समजले जाईल.
अचानक भेटी दिल्या जात आहे
आयुक्तांच्या सूचनेनुसार उपसंचालकांपासून ते जिल्हा आरोग्य अधिकारी व तहसील आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच अचानक भेटी देऊन रुग्णालय तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. तूर्तास कोणी दोषी आढळून आलेले नाहीत. विभागातील रिक्त पदे व ‘प्रमोशन’साठीचा प्रस्तावही आयुक्तांना पाठविला आहे.
-डॉ. वनिता जैन, उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर