Coronavirus in Nagpur; मुलांना लॉकडाऊननंतरही घराबाहेर पडू देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 07:45 AM2021-05-14T07:45:05+5:302021-05-14T07:45:29+5:30
Nagpur News कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बालरोग तज्ज्ञांनी पालकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मुलांना लॉकडाऊननंतरही घराबाहेर पडू देऊ नका अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
मेहा शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बालरोग तज्ज्ञांनी पालकांना शांत राहण्याचे व मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुलांना लॉकडाऊननंतरही घराबाहेर पडू देऊ नका अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांनी पालकांना घाबरू नका असे आवाहन केले. कोरोनाच्या आधीच्या दोन लाटेमध्ये आपल्याला उपचाराविषयी फारशी माहिती नव्हती़ आता कोरोनाविषयी व उपचाराविषयी पुरेसे ज्ञान उपलब्ध आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स सक्षम आहेत. केवळ योग्य नियोजन व सुविधा निर्मितीची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
डॉ. आनंद भुतडा म्हणाले, तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट एप्रिलमध्ये येईल असे भाकीत केले होते. आपण त्याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या लाटेने ६० वर्षांवरील नागरिकांना लक्ष्य केले होते. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केल्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये अशा नागरिकांना फार फरक पडला नाही़ कोरोनाने आता तरुणांना लक्ष्य केले आहे़ पुढे चालून लहान मुले कोरोना बाधित होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने यासाठी सज्ज रहायला हवे. तसेच, नागरिकांनी लहान मुलांची काळजी घ्यायला हवी.
डॉ. राजेश अग्रवाल यांनी घरी राहणे, मास्क वापरणे व सॅनिटायजेशन या तीन बाबी मुलांना कोरोनापासून वाचण्यास महत्वाच्या असल्याची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासनाने टास्क फोर्स तयार केली आहे. त्यात अनेक बालरोग तज्ज्ञांचा समावेश आहे. लहान मुलांची जी रुग्णालये कोरोना रुग्णालये झाली होती, त्यांना पुन्हा लहान मुलांसाठी उपयोगात आणण्याचा निर्णय झाला आहे. पालकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मुलांना आरोग्यवर्धक अन्न द्यावे़ घाबरून न जाता जबाबदार पालक व्हावे असे त्यांनी सांगितले.