हॅन्ड सॅनिटायझर लावून दिवे पेटवू नका : होऊ शकतो धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 12:42 AM2020-04-05T00:42:11+5:302020-04-05T00:43:43+5:30
दिवे किंवा मेणबत्ती लावतांना ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर टाळावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाला पराभूत करण्यासाठी आणि देशातील सामुदायिक सामर्थ्य दाखविण्यासाठी नागरिकांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घरात, बाल्कनीत, दारासमोर मेणबत्ती, दिवे, टॉर्च अथवा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परंतु दिवे किंवा मेणबत्ती लावतांना ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर टाळावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत दिवसातून कित्येकदा याचा वापर करीत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सुद्धा ‘सॅनिटायझर’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: प्रभावीपणे काम करण्यासाठी ‘अल्कोहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर करण्यावर भर दिला आहे. यामुळे हातावरील कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यास मदत होते. अशा ‘अल्कोहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर’मध्ये ‘आयसो प्रोपाईल अल्कोहल’, ‘इथेनॉल’ किंवा ‘एन-प्रोपेनॉल’चे ६० ते ९० टक्के मिश्रण असते. हे उच्च ज्वलनशील पदार्थ आहेत. यामुळे रविवारी दिवे किंवा मेणबत्ती पेटविताना हाताला सॅनिटायझर लावू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.- हात पेट घेऊ शकतो‘अल्कोहल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर’मध्ये अल्कोहलचे प्रमाण ६० टक्क्यांवर असते. आगपेटी, मेणबत्ती किंवा दिवे लावण्याचा प्रयत्न केल्यास सॅनिटायझर लावलेले हात पेट घेऊ शकतात. मोठा धोका होऊ शकतो. यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा दिवे लावताना या सॅनिटायझरचा वापर करू नये, केला असल्यास हात धुवावेत.
डॉ. शर्मिला राऊत
प्रमुख, मायक्रोबायलॉजी विभाग, मेयो