४५ मिनिटांपेक्षा टीव्ही, मोबाईल पाहू नका : बालरोग तज्ज्ञांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:40 PM2019-03-05T22:40:23+5:302019-03-05T22:43:31+5:30
लहान मुलांचे वय हे विकासाचे असते. परंतु याच वयात सर्वाधिक मुलांचा वेळ हा टीव्ही, मोबाईल पाहण्यात जातो. यामुळे मेंदूला नुकसान पोहचते. विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. लहान मुलांनी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहू नये, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहान मुलांचे वय हे विकासाचे असते. परंतु याच वयात सर्वाधिक मुलांचा वेळ हा टीव्ही, मोबाईल पाहण्यात जातो. यामुळे मेंदूला नुकसान पोहचते. विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. लहान मुलांनी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहू नये, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला.
‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’ नागपूर शाखेची नव्या कार्यकारिणीची माहिती देण्यासाठी मंगळवारी परिषदेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नवनियुक्त अध्यक्ष डॉ. रवींद्र भेलोंडे , सचिव डॉ. महेश तुराळे व डॉ. दिनेश सरोज यांनी लहान मुलांच्या विकासातील अडथळे यावर प्रकाश टाकला.
डॉ. सरोज म्हणाले, मोबाईल,टीव्हीपासून दूर राहण्याची जनजागृती मोहीम ‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’ शाळांमध्ये राबविणार आहे. पालकांमध्येही याची जनजागृती केली जाणार आहे.‘स्वीच ऑफ द स्क्रीन, स्वीच ऑन द पॉसिबिलिटीज’, असे ब्रीदवाक्य या उपक्रमाला दिले आहे. डॉ. तुराळे म्हणाले, नव्या कार्यकारिणीने या वर्षात शैक्षणिकसोबतच मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे. विमल आश्रमातील १६० मुलांच्या आरोग्याचा भार उचलला आहे. किशोरवयीन मुलांच्या लैंगिक शिक्षणाला घेऊन सेमिनार आयोजित केले जाणार आहे. डॉ. भेलोंडे म्हणाले, राज्यात डायरिया, न्यूमोनिया हा आजार लहान मुलांसाठी आजही धोकादायक ठरत आहे. याशिवाय, डेंग्यू व कुपोषणालाही गंभीरतेने घ्यायला हवे.
अशी आहे कार्यकारिणी
अध्यक्ष डॉ. रवींद्र भेलोंडे, सचिव डॉ. महेश तुराळे, पुढील वर्षाचे अध्यक्ष डॉ. शुभदा खिरवाडकर, माजी अध्यक्ष डॉ. मोईन हक, माजी सचिव दिनेश सरोज, उपाध्यक्ष डॉ. शिल्पा भोयर व डॉ. गिरीश चरडे, कोषाध्यक्ष डॉ. राजकुमार किरतकर, सहसचिव डॉ. प्रवीण डहाके, डॉ. संजय देशमुख, विशेष निमंत्रित, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. कुलदीप सुखदेवे, डॉ. दीपक गोयल, डॉ. वागीष कटारिया, डॉ. प्रशांत भुतडा व डॉ. अमित नेमाडे आदींचा सहभाग आहे.
पदाधिकाऱ्यांची दांडी
अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीमध्ये एकूण ३५ पदाधिकारी व सदस्य आहेत. परंतु पत्रपरिषदेला केवळ अध्यक्ष, सचिव व माजी सचिव उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या दांडीवर प्रश्न विचारला असता, पदाधिकारी कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करण्यात आले.