संमेलनाच्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:41 AM2018-12-23T01:41:35+5:302018-12-23T01:42:42+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चावरून सध्या रणकंदन माजले आहे. शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने संमेलनावर शृंगारीक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मराठी अस्मितेशी जुळलेले साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडावे यासाठी केलेल्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. उपाशी लेकरांबाबत सर्व सारखेच संवेदनशील असून यवतमाळ येथील संमेलन साधेपणानेच केले जात आहे. मात्र माहिती न घेता अवांछित आरोप करून संस्थेची जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चावरून सध्या रणकंदन माजले आहे. शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने संमेलनावर शृंगारीक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मराठी अस्मितेशी जुळलेले साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडावे यासाठी केलेल्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. उपाशी लेकरांबाबत सर्व सारखेच संवेदनशील असून यवतमाळ येथील संमेलन साधेपणानेच केले जात आहे. मात्र माहिती न घेता अवांछित आरोप करून संस्थेची जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.
संमेलनात अनावश्यक राजकारण्यांचा भरणा नसावा, कोणताही बडेजाव नसावा, संमेलन हे ऐश्वर्याचे, संपत्तीचे, प्रदर्शन करण्यासाठी नसावे व ते वाङ्मयीन दर्जा, गुणवत्ता यावर भर देत साधेपणाने व्हावे या सूचना महामंडळाने या कार्यकाळात आधीच आयोजकांना दिलेल्या आहेत व त्यांचे पालन या अगोदरच्या आयोजकांनी केले तसेच यवतमाळचेही आयोजक करीत असल्याची स्पष्टोक्ती डॉ. जोशी यांनी केली. आपली व्यथा जरूर आणि ठामपणे मांडलीच पाहिजे, पण त्यासाठी महामंडळावर पारंपरिक पद्धतीने , मुळात माहिती न घेता शृंगारासारखे अनिष्ट व तथ्यहीन आरोप करण्यात अर्थ नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. संमेलनात महिला देखील असतात याचे भानही बाळगले जावे. बाकीचे असंवेदनशील आहेत असे गृहीत धरूनच आरोप करणे व्यापक हिताचे नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कोणताही खर्च अवाढव्य नसून जो एवढ्या मोठ्या आयोजनासाठी आवश्यक आहे तितकाच किमान खर्च आयोजक करीत आहेत. ती शेतकरी कुटुंबातीलच मंडळी व यवतमाळ जिल्ह्यातीलच आहेत. जिल्ह्यातील इतरांप्रमाणेच ती देखील स्थानिक समस्यांबाबत तेवढीच संवेदनशील आहेत. साहित्यिकांनी मानधन, प्रवासखर्च घ्यायचा की त्यागायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. महामंडळ ते लादू शकत नाही. संमेलन आयोजकांकडून येणारे पैसे महामंडळाच्या खात्यात जमा होत नसतात. ते संमेलन निधीच्या स्वतंत्र खात्यात जमा होतात ते महामंडळाचे नसतात. तो स्वतंत्र व कायम निधी असून त्यातून कोणताच खर्च होत नसतो. ही माहिती करून न घेता आकारण आरोपबाजी करणे अर्थहीन व बेजबाबदारपणा दर्शविणारी असल्याची टीका डॉ. जोशी यांनी केली.
धनदांडग्यांनी चालविलेल्या अब्जावधींच्या बडेजावाला खासगी म्हणून समर्थन करणे म्हणजे संपत्तीच्या विषम वाटणीचे समर्थन करणे ठरत असल्याचे सांगत विशिष्ट व्यक्ती व संस्थेबद्दल आकस बाळगून हा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
महामंडळ अध्यक्ष बेभान : देवानंद पवार
साहित्य संमेलनावर अवास्तव उधळपट्टी होत असल्याचा आरोप करणारे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी डॉ. श्रीपाद जोशी यांच्या उत्तरावर प्रत्युत्तर देत महामंडळ अध्यक्ष बेभान झाल्याची टीका केली आहे. शृंगार हा शब्द संमेलनासाठी उभारण्यात येणारा अवाढव्य सभामंडप व त्याच्या सजावटीवर, स्वागत कमानी, मोठमोठ्या हॉटेलमध्ये महागडी निवास व्यवस्था, हारतुरे आणि भोजनावळीसाठी अभिप्रेत होता. मात्र या शब्दाचा महिलांशी संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न एका ज्येष्ठ साहित्यिकाकडून होत असल्याबद्दल पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. अवाढव्य खर्चाला अत्यावश्यक खर्च ठरवतांना साहित्य महामंडळ अध्यक्षांनी नेमके कोणते निकष लावले, असा सवाल त्यांनी केला. इच्छा व प्रामाणिक हेतू असेल तर कार्यक्रमाचा खर्च नक्कीच कमी करता येतो. केवळ खर्च कमी करण्याच्या सूचना देऊन जबाबदारी झटकून ते करता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली. कुणाबद्दलही आकस न ठेवता शेतकरी हितासाठीच या मुद्याला हात घातला असून त्याला अविवेकी म्हणणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. संमेलनातून स्थानिक वस्तू व सेवा पुरविणाऱ्यांना थोडा लाभ होत असला तरी त्यांची उपजीविका संमेलनावर अवलंबून नाही. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे कमीत कमी खर्च करण्याचा व वाचलेला खर्च शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्याच्या सूचना आयोजकांना देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.