प्रत्येक तापावर अॅन्टीबायोटिकची गरज नाही: डॉ. उदय बोधनकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:52 AM2018-01-06T00:52:39+5:302018-01-06T00:54:40+5:30
अॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे प्रत्येक तापावर प्रतिजैविकांची आवश्यकता नाही, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिषदेचे आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर यांनी येथे व्यक्त केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अॅन्टीबायोटिक (प्रतिजैविक) औषध हे मानवी संशोधनातील सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. परंतु वैद्यकीय सेवा प्रदान करताना काही डॉक्टर्स प्रतिजैविकांचा सर्रास वापर करतात. विशेषत: प्रत्येक तापावर प्रतिजैविक देतात. भविष्यात बालकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे प्रत्येक तापावर प्रतिजैविकांची आवश्यकता नाही, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व परिषदेचे आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर यांनी येथे व्यक्त केले.
‘पेडिकॉन-२०१८’ परिषदेत आयोजित सर्जन कमांडर डॉ. शांतिलाल शेठ यांच्या स्मृती व्याख्यानात ‘इव्हिडेन्स बेसड् पेडियाट्रिक प्रॅक्टिस’ या विषयावर डॉ. बोधनकर बोलत होते. डॉक्टरांनी प्रतिजैविक औषधे सांभाळून वापरताना रोगाचे निदान झाल्यावरच त्यांचा वापर करावा, असे सांगत डॉ. बोधनकर म्हणाले, आजारपणात सुरु वातीच्या काही दिवसात प्रतिजैविकांची गरज नसते. जीवाला धोका संभवल्यास डॉक्टरांनी अभ्यासानुसार त्याचा वापर करावा. यासाठी डॉक्टरांनी नेहमीच स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवावे. जोपर्यंत आपल्याला रोगाचे कारण मिळत नाही. तोपर्यंत कुठलेही प्रतिजैविक वापरू नये असा हितोपदेशही त्यांनी दिला. यावेळी ‘सीआयपीए’चे अध्यक्ष डॉ. संतोष सोअन्स, सचिव डॉ. रमेश कुमार उपस्थित होते.
क्रोधावर जागृती महत्त्वाची : डॉ. स्वाती भावे
आपण आक्र मक आणि दादागिरी करणाऱ्या मुलांना रागवतो. त्याच्या दादागिरीला बळी पडलेल्या मुलांप्रति सहानुभूती दाखिवतो. त्याचा परिणाम असा की, तो मुलगा आणखी मुलांवर दादागिरी करतो. अशा परिस्थितीमध्ये केवळ बळी पडलेल्या विद्यार्थ्यासोबतच दादागिरी करणाऱ्या मुलालादेखील समजून घेणे आवश्यक आहे. त्याचेही समुपदेशन व्हायला हवे, असे मत ‘एएसीसीआय’च्या कार्यकारी संचालक डॉ. स्वाती भावे यांनी व्यक्त केले. क्र ोध व्यवस्थापन या विषयावर त्या बोलत होत्या.
चिडका आहे, असे कौतुकानेही बोलू नका
भीती आणि राग या दोन मूलभूत भावना आहेत. पालकही घरामध्ये आमचा मुलगा फार चिडका आहे, असे कौतुकाने बोलतात. पालकांनी हे बोलणे आवर्जून टाळले पाहिजे, असा संदेश यावेळी डॉ. स्वाती भावे यांनी पालकांना दिला.
क्रोध अनेक आजाराची जननी
क्रोध हा रक्तदाब ते अनेक दुर्धर रोगांपर्यंत अनेक आजारांची जननी आहे. त्या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना राग व्यवस्थापनाचे धडे मिळायला हवेत. सिनेमा, प्रसारमाध्यमे या रागाला खतपाणी घालण्याचे काम करतात. घरचे व शाळेचे वातावरणदेखील कारणीभूत ठरते, असेही डॉ. भावे म्हणाल्या.