पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:12+5:302021-06-04T04:08:12+5:30
भिवापूर : शेतीची मशागत आणि खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशात काही शेतकरी पहिल्या पावसातच पेरणीला ...
भिवापूर : शेतीची मशागत आणि खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशात काही शेतकरी पहिल्या पावसातच पेरणीला सुरुवात करतात. यात अनेकदा पेरणी फसते आणि शेतकरी कैचीत सापडतो. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी करा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. २ ते ४ जूनपर्यंतच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
विदर्भात ५ जून रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खाते व कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शेतकरी बांधवांनी किमान ८० ते १०० मि.मी. इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यास जमिनीत पुरेशा खोलीत ओलावा जातो. त्यानंतर पावसाचा खंड जरी पडला तरीही पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी केले आहे.
शिवाय सोयाबीन, तूर, भुईमूग व मका, आदी पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीपूर्व तयारीची कामे करणे आवश्यक आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी दिली.