चोरांचे समर्थन करून स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू नका; वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:31 PM2023-12-06T12:31:47+5:302023-12-06T12:32:44+5:30
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी त्यांनी आरोग्य खात्यातले घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शोषित, वंचित अशांना माणूस म्हणून उभे राहण्याची ताकद दिली, तसेच जगातील सर्वोत्कृष्ट अशी संविधान घटना या देशाला बाबासाहेबांनी दिली. त्यामुळेच या देशातील लोकशाही चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आहे. संविधान रुपी ग्रंथाची जोपासना करू, त्याला टिकवू त्याचे रक्षण करू, हीच खरी श्रद्धांजली आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ठरेल, असे उद्गार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काढले.
याचबरोबर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी त्यांनी आरोग्य खात्यातले घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
आरोग्य विभागात खूप मोठे घोटाळे आहेत. विधानसभेत आरोग्य खात्यातला भोंगळ कारभार समोर आणू. तानाजी सावंत यांचे अनेक घोटाळे आहेत. आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत. ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये मांडू, असे वडेट्टीवार म्हणाले. यावर मुख्यमंत्री कारवाई करतील का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता याचे उत्तर आम्ही कारवाई करा म्हणून सभागृहात मागणी करू, असे ते म्हणाले.
गैरप्रकार झाला असेल, पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. नाहीतर चोरांना समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू नका, असा सल्ला वडेट्टवार यांनी शिंदेंना दिला. तसेच तिघे मिळून तिजोरीची लूट करत आहेत. पैशाशिवाय मंत्री काम करत नाहीत. 20 टक्के पेक्षा जास्त कमिशन घेणार राज्य महारष्ट्र झाल आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.