मराठी- हिंदी भाषकात भांडणे लावू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:51 PM2018-02-24T23:51:40+5:302018-02-24T23:52:07+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळा विदर्भ देण्याची येथील हिंदी भाषकाची मागणी असल्याचे वक्तव्य केले. मुळात शरद पवारांनी मराठी व अमराठी असा वाद निर्माण करून भांडणे लावू नये व विदर्भाची विभागणी करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आ. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी नेत्यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळा विदर्भ देण्याची येथील हिंदी भाषकाची मागणी असल्याचे वक्तव्य केले. मुळात शरद पवारांनी मराठी व अमराठी असा वाद निर्माण करून भांडणे लावू नये व विदर्भाची विभागणी करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आ. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी नेत्यांनी दिला. त्यांची ही भूमिका अतार्किक असून विदर्भाची मागणी पवारांच्या जन्मापूर्वीची आहे, अशी टीकाही चटप यांनी केली.
चटप म्हणाले, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन राज्य निर्माण केली तेव्हा पवार बोलले नाही. आंध्रप्रदेशच्या विधानसभेने तेलंगणाच्या निर्मितीचा प्रस्ताव फेटाळला व त्यानंतरही तेलंगणाची निर्मिती झाली, तेव्हाही बोलण्याचे धाडस केले नाही. फक्त विदर्भाचा मुद्दा आला की सार्वमत घेण्याची भाषा करतात. अशी सोईस्कर भूमिका घेणे पवारांनी थांबवावे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भातील चार जिल्ह्यात विदर्भाच्या मुद्यावर मतदान घेतले. त्यावेळी ९२ टक्के लोकांनी विदर्भाला पाठिंबा दिला. मतदान करणाºयांमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते आघाडीवर होते. निदान स्वत:च्या पक्षातील लोकांच्या भावनांचा तरी पवारांनी आदर करावा, असा चिमटाही त्यांनी घेतला.
डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, विदर्भातील लोक भाषा, धर्माचा भेद मानत नाहीत. पवारांनी असे वक्तव्य करून भेदभाव पसरविण्याचे काम केले आहे. विदर्भ देणारच नाही, अशी भूमिका असंवैधानिक असल्याचे त्यांनी सांगितले. राम नेवले यांनीही पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली. या वेळी विजया धोटे, अॅड. गोविंद भेंडारकर, अरुण मुनघाटे, मुकेश मासुरकर, अरुण केदार, श्याम वाघ, भय्यालाल माकडे, दीपक गोतमारे, अभ्युदय गोसे आदी उपस्थित होते.
अॅड. गोविंद भेंडारकर व मासुरकर यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा
चंद्रपूर येथील राष्ट्रवादीचे नेते व प्रदेश प्रतिनिधी अॅड. गोविंद भेंडारकर तसेच गडचिरोली येथील राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुनघाटे यांनी या वेळी शरद पवार यांच्या विदर्भ विरोधी भूमिकेमुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. अॅड. भेंडारकर हे १३ वर्षांपासून राष्ट्रवादीत सक्रिय आहेत. ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले असून २०१४ मध्ये त्यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढविली होती. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे ते सदस्य आहेत. या वेळी अॅड. भेंडारकर म्हणाले, जनतेला विदर्भ हवा आहे. मात्र, शरद पवार यांनी भाषेवरून विदर्भात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार विदर्भात येतात तेव्हा सोयीस्कर बोलतात. तिकडे गेले की बदलतात. विदर्भातील आत्महत्या, नक्षलवाद, बेरोजगारी या विषयांवर ते का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. मुनघाटे यांनीही पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली.