सेक्सला क्षुल्लक समजू नका : संजय देशपांडे यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 08:56 PM2020-02-22T20:56:51+5:302020-02-22T20:59:30+5:30
मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्यासाठी चांगले लैंगिक आयुष्यही महत्त्वाचे ठरते. यामुळे डॉक्टरांनी हा प्रश्न विचारून त्यांचे समुपदेशन करावे. ‘सेक्स’ला क्षुल्लक समजू नका, असे आवाहन प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. संजय देशपांडे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लैंगिक आयुष्य अनुभवणे हे निरोगी, निकोप जीवनाचे लक्षण आहे. परंतु जसजसे आपण वयाने प्रौढ होतो तसतसे लैंगिक सुख घेण्याची गरज उरत नाही, असा एक गैरसमज, जो समाजात रूढ आहे. विशेषत: वयाच्या ४५ नंतर मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण जेव्हा फिजिशियनकडे येतात तेव्हा आरोग्याला घेऊन अनेक प्रश्न विचारले जातात. परंतु लैंगिक आयुष्याबाबत विचारले जात नाहीत. मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्यासाठी चांगले लैंगिक आयुष्यही महत्त्वाचे ठरते. यामुळे डॉक्टरांनी हा प्रश्न विचारून त्यांचे समुपदेशन करावे. ‘सेक्स’ला क्षुल्लक समजू नका, असे आवाहन प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. संजय देशपांडे यांनी येथे केले.
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, विदर्भ शाखेच्या १२व्या वार्षिक परिषदेचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. मंगेश तिवस्कर, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, मेळघाटात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. आशिष सातव यांच्यासह परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. प्रभाकर देशपांडे, आयोजन सचिव डॉ. विनोद खंडाईत, ‘एपीआय’चे सचिव डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. सुहास कानफाडे आदी उपस्थित होते. संचालन डॉ. अमोल मेश्राम व डॉ. आसावरी देशपांडे यांनी केले तर आभार डॉ. खंडाईत यांनी मानले.
लैंगिक आयुष्याचे शत्रू
डॉ. देशपांडे म्हणाले, लैंगिक आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर ते वय आहे. परंतु वयाच्या ४५नंतर पती-पत्नीमधील लैंगिकविषयक न्यूनगंड दूर केल्यास दोघांच्या आरोग्यासाठी हिताचे ठरते. वयासोबतच लठ्ठपणा, अयोग्य जीवनशैली, धूम्रपान, १० ते १४ टक्के मधुमेह, शहरात २९ टक्के तर ग्रामीणमध्ये २७ टक्के उच्च रक्तदाब, हृदय रक्तवाहिन्यांच्या विकार, अमली पदार्थ व चुकीचे संबंध हेही शत्रू आहेत.
४५नंतरही ६९ टक्के लोक लैंगिक जीवन जगत आहेत
‘अमेरिकन नॅशनल कौन्सिल ऑन एजिंग फाऊंड’ यांनी केलेल्या एका अभ्यासातून हे समोर आले, ४५ ते ५९ वयोगटातील ६० टक्के लोक आपले लैंगिक जीवन जगतात. यामुळे लैंगिक जीवनाबद्दल उदासीनता बाळगू नये. यातच ‘अनअट्रॅक्टिव्ह’ राहिल्यास लैंगिक जीवन लोप पावण्याची शक्यता असते. यामुळे या वयातही ‘अट्रॅक्टिव्ह’ राहा. एकमेकांचा आदर करा, असा सल्लाही डॉ. देशपांडे यांनी दिला.