उद्योगांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका

By Admin | Published: May 30, 2016 02:16 AM2016-05-30T02:16:30+5:302016-05-30T02:16:30+5:30

नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करावयाचे आहे. यासाठी दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्योगासाठी पुनर्वापर करावा.

Do not use drinking water for industries | उद्योगांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका

उद्योगांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका

googlenewsNext

नितीन गडकरी : एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पण
नागपूर : नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करावयाचे आहे. यासाठी दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्योगासाठी पुनर्वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर उद्योगांनी करू नये, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.
नरेंद्रनगर भागातील पीएमजी कॉलनी येथे जपानच्या कंपनीने प्रतिदिन १० हजार लिटर क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होेते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रा.अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, जपानच्या डायको एक्सेस कंपनीचे संचालक हिरोशी ओगमे, प्रबंधक रुई ओवेसा आदी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे नाल्यातील पाण्याचा उद्यानासाठी पुनर्वापर केला जाणार आहे. शहरातील उद्यानासाठी अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याची गरज आहे. दूषित पाण्याचा पुनर्वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामासाठी न करता दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करावा. महापालिका अशा स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करीत आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करताना त्यापासून मिथेन गॅस व सीएनजी गॅस निर्माण होईल.
भांडेवाडी येथे अशा स्वरुपाचा प्रकल्प उभारला जात आहे. यावर शहरातील बसेस चालणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला मदत होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज १० हजार लिटर दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. महापालिकेने येथे टाकी निर्माण केली आहे. यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे प्रवीण दटके यांनी सांगितले.
सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, सुनील अग्रवाल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रकाश तोतवानी, अतिरिक्त उपायुक्त संजय काकडे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मो. इसराईल यांनी तर संचालन अविनाश ठाकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार सुरेश भजे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Do not use drinking water for industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.